इंटरनेट ऑफ थिंग्स’ वर प्रभुत्व मिळवणे काळाची गरज : चित्तरंजन महाजन
schedule19 Nov 25 person by visibility 58 categoryशैक्षणिक
वारणानगर : तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात "इंडस्ट्री रेडी इंजिनिअर प्रोग्राम" अंतर्गत तीन दिवसीय कृतिशील कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या प्रसंगी डॉल्फिन लॅबचे प्रमुख चित्तरंजन महाजन यांनी विद्यार्थ्यांना ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ (IoT) या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून सांगताना, “दैनंदिन जीवनात इलेक्ट्रॉनिक्सच्या वाढत्या वापरामुळे IoT ला पर्याय उरणार नाही; त्यामुळे या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणे ही काळाची नितांत गरज आहे”, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी, वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे (सावकर), वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी, प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांनी शुभेच्छा दिल्या.
अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात वापर करून विद्यार्थ्यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. एस. एम. पिसे यांनी केले. विद्यार्थी महाविद्यालयात असतानाच आवश्यक उद्योग-कौशल्य आत्मसात करून इंडस्ट्री-रेडी इंजिनिअर म्हणून बाहेर पडावेत, यावर त्यांनी भर दिला.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
विभाग प्रमुख डॉ. एस. टी. जाधव, डॉ. आर. बी. पाटील, डॉ. पी. व्ही. मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. एस. व्ही. लिंगराजू, प्रा. एच. एम. केल्लूर, प्रा. पी. डी. लोले आणि विद्या सेवक यांनी विशेष योगदान दिले. उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. टी. जाधव यांनी स्वागत केले, तर डॉ. लिंगराजू यांनी आभार मानले.