कोल्हापूर महानगरपालिका : मुख्य निवडणूक कार्यालयात सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
schedule17 Dec 25 person by visibility 77 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आज मुख्य निवडणूक कार्यालयात सर्व सात निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना नकाशे व अन्य आवश्यक साहित्य सायंकाळपर्यंत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मतदान केंद्रे दिनांक 20 डिसेंबर 2025 अखेर अंतिम करण्यात येणार असून, सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उद्या गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रभागातील सर्व मतदान केंद्रे तपासून त्या ठिकाणी सोयी सुविधांची पाहणी करून अंतिम करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या. नवीन मतदान केंद्रे ही शक्यतो महापालिकेच्या इमारतींमध्येच स्थापन करण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील सर्व होर्डिंग्स, बॅनर्स व पोस्टर्स काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून, संबंधित प्रभाग क्षेत्रात आणखी अनधिकृत होर्डिंग्स आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एफ.एस.टी. व व्ही.एस.टी. एस. एस. टी. पथके सायंकाळपर्यंत स्थापन करण्यात येणार असून त्यांचे कामकाज उद्यापासून सुरू होणार आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.
तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था व पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असून, सेक्टर ऑफिसर नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. यापुढे सर्व प्रकारच्या निवडणूक परवानग्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातूनच देण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना प्रशासकांनी दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप आयुक्त किरणकुमार धनवाडे, निवडणूक निर्णय अधिकारी सुशील संसारे, संदीप भंडारे, एकनाथ काळबांडे, शक्ती कदम, रूपाली चौगुले तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र यादव, रोहिणी गायगोपाळ, दिगंबर सानप, विजय जाधव, ऋतुराज निकम, संजय काटकर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण, उपशहर अभियंता अरुण गुजर, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाढ आदी अधिकारी उपस्थित होते.





