जातिवंत म्हैशींच्या संगोपनातून दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती शक्य : अभिजीत तायशेटे
schedule17 Dec 25 person by visibility 192 categoryउद्योग
▪️जातीवंत म्हैशींच्या संगोपनावर भर; राधानगरीत ‘गोकुळ’च्या कृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या (गोकुळ) च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्व.आनंदराव ज्ञानदेव पाटील (चुयेकर) म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कृती कार्यक्रम २०२५–२६’ अंतर्गत राधानगरी येथे प्राथमिक दूध संस्था सचिवांची विभागीय मिटिंग दि.१४/१२/२०२५ इ.रोजी राधानगरी येथे उत्साहात पार पडली. दूध उत्पादनात लक्षणीय वाढ करण्यासाठी पारंपरिक पद्धतींना फाटा देत जातीवंत म्हैशींची खरेदी व सुधारित संगोपन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय या मिटिंगमध्ये घेण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे म्हणाले, दूध व्यवसाय टिकवून नफ्यात नेण्यासाठी आधुनिक व शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. स्थानिक जनावरांच्या तुलनेत जातीवंत म्हैशी अधिक दूध देतात. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, गोकुळ दूध संघामार्फत राबविण्यात येणारा ‘स्व.आनंदराव ज्ञानदेव पाटील (चुयेकर) म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कृती कार्यक्रम’ हा शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार असून, या माध्यमातून जातीवंत म्हशींची योग्य निवड, खरेदी, संगोपन, आहार व्यवस्थापन व रोगप्रतिबंधक उपाययोजनांबाबत तांत्रिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. जनावर खरेदी करताना शेतकऱ्यांना तांत्रिक अथवा आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी गोकुळ संघ सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके यांनी उपस्थित दूध संस्था सचिवांना जनावरे खरेदी करताना आवश्यक पारख, खरेदीनंतरचे हवामान व आहार व्यवस्थापन तसेच कमी खर्चात अधिक दूध उत्पादन कसे मिळवता येईल, याबाबत सविस्तर तांत्रिक माहिती दिली. दरम्यान, के.डी.सी.सी. बँकेचे निरीक्षक रामभाऊ इंगळे यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती देत म्हैस खरेदीसाठी बँकांकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याची प्रक्रिया स्पष्ट केली. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जप्रकरण करणे कामी कोणतेही अडचणीवर येणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या मिटिंगमध्ये प्रत्येक दूध संस्थेसाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. लहान संस्थांच्या सचिवांनी किमान दोन तर मोठ्या संस्थांच्या सचिवांनी किमान चार ते पाच जातीवंत जनावरे खरेदी करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व दूध संस्था सचिवांनी आपल्या-आपल्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातीवंत म्हशींची खरेदी करण्यासाठी सक्रियपणे प्रेरित करावे. असे गोकुळच्या वतीने आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, बोरवडे शीतकरण केंद्राचे दूध संकलन अधिकारी राजेंद्र चौगले, सहाय्यक दूध संकलन अधिकारी पी.डी.चव्हाण, मुकुंद पाटील यांच्यासह राधानगरी विभागातील सर्व सुपरवायझर, विविध दूध संस्थांचे सचिव व मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.





