खळबळजनक: कोल्हापुरात रंगाचा स्टॉल वाचवण्यासाठी लाच घेताना महापालिका अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात!
schedule10 Mar 26 person by visibility 238 categoryगुन्हे
कोल्हापूर: शहरात एकीकडे रंगपंचमीचा उत्साह असतानाच, दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेचा भ्रष्ट चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. अतिक्रमण कारवाईची भीती दाखवून गरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधीक्षकाला मंगळवारी (१० मार्च) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. विलास शामराव साळोखे (वय ५५, रा. फुलेवाडी) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्या या कृत्याने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सणानिमित्त रंग विक्रीचा स्टॉल लावणाऱ्या तक्रारदाराला "तुझा स्टॉल अतिक्रमणात आहे" अशी भीती घालून साळोखे याने कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली होती. सुरुवातीला १५०० रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती २००० रुपये ठरले. मात्र, तक्रारदाराने न डगमगता एसीबीकडे धाव घेतली. मंगळवारी सापळा रचला असता, साळोखेने लाचेची रक्कम स्वीकारून ती आपल्या दुचाकीच्या पिशवीत ठेवताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला झडप घालून पकडले.
एसीबीने त्याची दुचाकी आणि रोकड जप्त केली असून, त्याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.