माती व माणसाचे आरोग्य आधुनिक तंत्रज्ञानाने दर्जेदार करणे ही काळाची गरज : डॉ. चंद्रशेखर बिरादर; राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ स्पर्धेचे केआयटीत दिमाखदार उद्घाटन
schedule08 Dec 25 person by visibility 117 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या इनोवेशन सेल्स च्या पुढाकाराने व एआयसीटीईच्या सहकार्याने ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’- २५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयात आज सोमवार ८ डिसेंबर २५ रोजी संपन्न झाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले, “जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. भारतासहित अमेरिका, जपान, जर्मनी, चीन या सर्व देशांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात जी आधुनिकता आलेली आहे ती तेथील विद्यापीठातून सतत चालू असणाऱ्या संशोधनाचा व ते संशोधन प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणाऱ्या टेक्नोसेव्ही तरुणाईच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. भारताच्या विविध राज्यातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी केआयटी अभियांत्रिकी कॉलेज कोल्हापूरच्या वतीने स्वागत केले असेच या स्पर्धेच्या काळात सर्व प्रकारच्या सहकार्याबाबत आश्वस्त केले.
स्पर्धेचे उद्घाटक ज्येष्ठ शास्त्रज्ञ उद्योजक डॉ.चंद्रशेखर बिरादर यांनी इनोव्हेशन, शाश्वत शेती,पर्यावरण,शेती उत्पादनांचा जागतिक स्तरावरील व्यापार, दर्जा याबाबत उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, “ माती व माणसाचे आरोग्य दर्जेदार, शाश्वत ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने योग्य त्या प्रकारच्या उपाय योजना केल्या पाहिजेत. आपल्या तंत्रज्ञानातील कमतरता किंवा आपण ज्यात मागे आहोत त्या सर्व विषयात या तरुणाईने काम करून भारताला विकसित देश करण्यामध्ये योगदान दिले पाहिजे.आपले विकसित तंत्रज्ञान संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आपणच दिले पाहिजे. आपल्या देशातील जेन-झी अशा विषयात सकारात्मक भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचे पर्यावरण शेती व शेतीवर आधारित उद्योग हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार तसेच गतिमान करण्याबाबतीत कार्य करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग चा वापर शेती, पर्यावरण या विषयात अधिक चांगल्या प्रकारे करण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केले. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था भक्कम असेल तर तो देश सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करत असतो. त्यामुळे आपण सर्वांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इनोव्हेशन च्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष ठेवून गांभीर्याने काम केले पाहिजे जेणेकरून आपली शेतकऱ्याची, समाजाची व देशाची आर्थिक उन्नती होईल. जगातील सगळ्यात मोठी तरुणाईची शक्ती भारतामध्ये आहे व ही तरुणाईची क्षमता देशाच्या विविध प्रश्नांवरती केंद्रित करून त्यांच्या माध्यमातून विविध तांत्रिक उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न भारत सरकार करत आहे त्या बद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार व कौतुक केले आहे. अशा स्पर्धांच्या आयोजानातून तरुणाईवरील विश्वास व तरुणाईचा आत्मविश्वास हे दोन्ही वृद्धींगित होणार आहे. त्यामुळे अशा तांत्रिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन दिलेल्या आव्हानांना आपापल्या कृतीशील विचाराने सामोरे जाण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रुती काशीद व प्रा.शुभदा सावरखंडे यांनी केले.या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन ज्या राज्यामध्ये, शहरामध्ये होत आहे अशा महाराष्ट्राच्या व कोल्हापूरच्या इतिहास,व सर्च क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती करून दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली यांच्या हस्ते महालक्ष्मी ची प्रतिमा देऊन करण्यात आले.यावेळी मंचावर संस्थेचे सचिव दीपक चौगुले, या स्पर्धा केंद्राच्या ए.आय.सी.टी.ई.च्या प्रतिनिधी श्रीमती आकांक्षा शेजाळ , स्पर्धेचे संयोजक प्रा.अजय कापसे व सह-संयोजक प्रा गोसावी प्रवीण हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या उद्घाटन कार्यक्रमासाठी ११ राज्यातून २८ महाविद्यालयातून आलेले १७० स्पर्धक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच त्यांचे २५ मार्गदर्शक उपस्थित होते. केआयटी चे विश्वस्त, रजिस्ट्रार,सर्व विभाग प्रमुख, अधिष्ठाता प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.