गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखालीच गेल्याने जगणेच जणू एका टप्प्यावर थबकले होते. या परिस्थितीपुढे प्रत्येक जण हतबल बनला होता. या लाटांनी कुणाचे आई-वडील, कुणाचा पोटचा गोळा, तर कुणाचे सर्वस्व हिरावून नेले. लॉकडाऊनमुळे कंपन्या पटापट बंद पडल्याने बरेचजण बेरोजगार झाले. कोरोनाने तर ऊन-पावसाचाच खेळ सुरू केला आहे. यंत्रांची धडधड थांबली तसे अर्थचक्राचे चाकही कर्णाच्या रथाच्या चाकाप्रमाणे गाळात रुतत चालले. ही परिस्थिती आपल्या देशातच नाही तर जगभर कमी-अधिक प्रमाणात दिसून आली. श्रीमंत अधिक श्रीमंत झाले, तर गरीब अधिक गरीब झाले. सरकारे मूठभरांची बटीक होऊन बसली.
कोरोनाने माणसाला जगणे शिकवले असा मतप्रवाह सोशल मीडिया, चारचौघात चर्चिला जातो. मुळात आपण खरेच जगणे शिकलो का? हा यक्षप्रश्न आहे. कोरोनाने आपल्या मर्यादा उघड करून दाखविल्या. मात्र त्यापासून धडा घेण्याऐवजी आपण त्याच त्याच चुका पुन:पुन्हा करत चाललोय. नियम हे नियंत्रित ठेवण्यासाठी असतात. मात्र, ते डावलून आपल्यापैकीच अनेकजण अनियंत्रित वागत आहेत. लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित अशा आविर्भावातच अनेकजण वावरताना आजही दिसून येतात. सगळीकडे बेफिकिरी. त्यात आपली सरकारे एकमेकांसोबत जणू कबड्डी खेळताहेत. आज तुझा डाव, उद्या माझा डाव, अन परवा एकत्र खाऊ. जनता की ऐशीतैशी. सरकारी यंत्रणा तर खाऊन खाऊन सुस्त झालेली. त्यांचा सगळा आकड्यांचा खेळ. कोरोनासुद्धा म्हणत असेल सरकारी काम आणि सहा महिने थांब, मी पुन्हा येईन. यात मात्र असंघटित कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. घरात खाणारी दहा तोंडे, मात्र रोजगार नाही. जगावे तरी कसे. शासनाने जाहीर केलेल्या सवलती तुटपुंज्या. त्याही सरकारी यंत्रणांच्या साखळीतून झिरपून येणाऱ्या. समोर खर्च तर आ वासून उभा राहणारा. जगायचे कसे? त्यांच्यासमोर हा एकच प्रश्न. मात्र, सरकारी धोरण लकव्यामुळे हा वर्ग सध्या देशोधडीला लागला आहे. त्यात कोरोनाचे संकट पुढे घास घ्यायला उभे आहेच.
२०२१च्या पूर्वार्धात कोरोनाने कहर केला होता. यात अनेक घरे उदध्वस्त झाली. उत्तरार्धात परिस्थिती थोडी सुधारली असे वाटत होते. लॉकडाऊन उठविण्यात आला. यंत्रांची चाके धडधडू लागली. जनजीवन थोडेफार पूर्वपदावर आले. सण उत्सव जोरात साजरे करण्यात आले. एकंदरीत गाडी रुळावर येत होती. गोरगरिबांचे संसार सावरत होते. मात्र, तोपर्यंत ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटने वर्षाअखेरीस उचल खाली असून, रुग्णात वाढ झाली आहे. आधीच वारंवारच्या लॉकडाऊनने जनता मेटाकुटीला आली आहे. ती आता या महामारीच्या फेऱ्यातून विसावा शोधत आहे. ते पण जगण्यासाठी थोडे बळ मिळविण्यासाठी. आज २०२२मध्ये आपण पाऊल टाकले आहे. हे वर्ष नवीन आशा, अपेक्षांना चालना देणारे, नवीन स्वप्नांना पंख देणारे ठरो, तसेच जरा विसाऊ या वळणावर...असे वाटणारे ठरो हीच अपेक्षा!