उभयचरांच्या संवर्धनासाठी शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्र परिणामकारक: डॉ. नरहरी ग्रामपुरोहित
schedule13 Jan 26 person by visibility 44 categoryराजकीय
कोल्हापूर : जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या दृष्टीने उभयचरांच्या शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्राचे उपयोजन अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक ठरणारे आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. नरहरी ग्रामपुरोहित यांनी काल (दि. १२) येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमास डॉ. प्रतापसिंह वरुटे प्रमुख उपस्थित होते.
“उभयचरांच्या संवर्धन शारीरक्रियेत शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्राचे महत्त्व” या विषयावर बोलताना डॉ. ग्रामपुरोहित म्हणाले, बेडूक, साप, सरडे यांसारखे उभयचर व सरीसृप प्राणी आज पर्यावरणीय बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्राण्यांच्या संवर्धनासाठी आधुनिक विज्ञानात शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्र (Non-invasive Endocrinology) ही एक महत्त्वाची आणि उपयुक्त पद्धत ठरत आहे. या पद्धतीत प्राण्यांना इजा न करता त्यांच्या लघवी, विष्ठा, त्वचा स्राव किंवा केसांमधील संप्रेरकांचे (हार्मोन्सचे) परीक्षण केले जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती, तणावाची पातळी, प्रजननक्षमता आणि पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता समजते.
डॉ. ग्रामपुरोहित पुढे म्हणाले, पूर्वी प्राण्यांवर शस्त्रक्रिया करून किंवा रक्तनमुने घेऊन अभ्यास केला जात असे. मात्र या प्रक्रियेमुळे प्राण्यांना तणाव येत असे. शस्त्रक्रियाविरहित पद्धतीमुळे प्राणी सुरक्षित राहतात आणि नैसर्गिक वर्तनात अडथळा येत नाही. या संशोधनामुळे संकटग्रस्त प्रजातींच्या प्रजनन कार्यक्रमांना चालना मिळते, त्यांचे आरोग्य वेळेवर तपासता येते आणि संवर्धनाच्या योजना अधिक परिणामकारकपणे राबवता येतात. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी ही पद्धत भविष्यात अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. प्रतापसिंह वरुटे यांनी माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब वरुटे यांच्या जीवनकार्याविषयी उपस्थितांना अवगत केले. व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. माधव भिलावे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. साईंजली पाटील व वेदिका गुरव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अधिविभागप्रमुख डॉ. एस.आर. यन्कंची यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

