कोल्हापूरात ‘संपूर्ण गीतरामायण’चा भव्य सोहळा : २३ ते २६ मार्च दरम्यान आयोजन
schedule20 Mar 26 person by visibility 116 categoryसामाजिक
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सांगीतिक परंपरेतील अजरामर ठेवा असलेल्या ‘संपूर्ण गीतरामायण’चे भव्य आयोजन कोल्हापूरात येत्या २३ ते २६ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम रंगणार असून, संपूर्ण ५६ गीते सर्व कडव्यांसह सादर केली जाणार आहेत.
अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, स्वरब्रह्म संस्था आणि प्रसारमाध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी कै. ग.दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि भावतीर्थ कै. सुधीर फडके (बाबूजी) यांच्या संगीताने सजलेले ‘गीतरामायण’ सलग पाचव्या वर्षी कोल्हापूरात सादर होत आहे. यापूर्वीच्या चार वर्षांत या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
पश्चिम महाराष्ट्रात सर्व गीते व सर्व कडव्यांसह ‘संपूर्ण गीतरामायण’ सादर करणारा स्वरब्रह्म हा एकमेव समूह ठरला आहे. स्वरब्रह्मचे संस्थापक स्व. सुधीर दाजी जोशी यांचे सुपुत्र रोहित जोशी यांनी सलग साडेआठ तास गीतरामायण गायन करून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे, हा कोल्हापूरच्या सांगीतिक परंपरेसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
या भव्य सांगीतिक सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे