कोल्हापूरमध्ये गुरुवारपासून ‘ग्लोबल टेककॉन २०२६’ चे आयोजन
schedule05 Jan 26 person by visibility 162 categoryशैक्षणिक
▪️इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी, एज्युकेशन वरील पहिली जागतिक परिषद
▪️डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून आयोजन
कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली (आय. एस. टी. ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ जानेवारी रोजी ‘ग्लोबल टेक कॉन 2026’ च्या पहिल्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशनवरील ही पहिली जागतिक परिषद असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत आणि आय. एस. टी. ई महाराष्ट्र- गोवा सेक्शनचे चेअरमन डॉ. रणजीत सावंत यांनी दिली.
गुरुवारी सकाळी १० वाजता हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात या परिषदेचे उद्घाटन होणार असून तांत्रिक सत्रे तळसंदे येथे आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उद्घाटन समारंभाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए. आय. सी. टी. ई. )नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष प्रा. टी. जी. सीतारामहे प्रमुख अतिथी असतील. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य तसेच भारत सरकारचे माजी सचिव आणि राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे, आयआयआयटीएम ग्वाल्हेरचे संचालक प्रा. एस. एन. सिंग, महाराष्ट्र सरकारच्या तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील, आय.सी.टी.ई चे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, कुलगुरू डॉ. अनिल कुमार गुप्ता यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत उद्घाटन समारंभ होणार असून दुपारी २ नंतर डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे येथे विविध तांत्रिक मार्गदर्शनपर सत्रे होणार आहेत. या परिषदेसाठी केरळ, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र त्याचबरोबर युनायटेड किंगडम व इटली येथून ४३० रिसर्च पेपर प्राप्त झाले असून त्यातील ३१० पेपर्स निवडण्यात आले आहेत. ‘ग्लोबल टेककॉन’चे दुसरे सत्र १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे संपन्न होणार असल्याची माहिती यावेळी डॉ. खोत आणि आणि डॉ. सावंत यांनी दिली.

