शिवाजी विद्यापीठात आकर्षक शोभायात्रेने ‘शिवस्पंदन’ सुरू
schedule06 Jan 26 person by visibility 139 categoryशैक्षणिक
🔹️छत्रपती शिवरायांसह शाहू महाराज, फुले दांपत्य, राज कपूर अवतीर्ण; विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला आज सकाळी अत्यंत आकर्षक व दिमाखदार शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आहे.
या शोभायात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह राज कपूर, नर्गीस, दादा कोंडके, उषा चव्हाण, व्ही. शांताराम, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सिमी गरेवाल आदी कलाकारांच्या व्यक्तीरेखाही विद्यापीठाच्या प्रांगणात अवतरल्या. त्याखेरीज सहभागी अधिविभागांच्या संघांनी अतिशय कल्पकतेने प्रबोधनपर विषयांचे सादरीकरण शोभायात्रेद्वारे केले. शेतकरी, महाराष्ट्राची लोकसंस्कृती, सण व परंपरा, भारताच्या विविध प्रांतांमधील नागरिकांच्या वेशभूषा, आजची मल्टिटास्किंग महिला इत्यादींचेही दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी केवळ वेशभूषेवरच समाधान मानता शेतकरी आत्महत्या, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षण, मतदार जागृती व लोकशाही, वास्तव आणि आभासी जगातील फरक इत्यादींविषयीही सादरीकरण करून लक्ष वेधून घेतले. विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनीही शोभायात्रेत आवर्जून सहभाग घेतला.
आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. मीना पोतदार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार आणि डॉ. प्रमोद कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य इमारतीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घालून हलगी व ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य इमारतीसमोर सहभागी संघांनी आपापल्या विषयाच्या अनुषंगाने अत्यंत देखणे सादरीकरण केले.
🔹️शिक्षणापलिकडे विचारांची सौहार्दपूर्ण देवाणघेवाण अपेक्षित: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
शोभायात्रेनंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शिवस्पंदन महोत्सवाचे प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी विद्यापीठात शिक्षण घेणे आवश्यकच आहे. तथापि, त्यापलिकडे जाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकमेकांशी विचारांची सौहार्दपूर्ण देवाणघेवाण करावी, हाच हेतू शिवस्पंदनच्या आयोजनामागे आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरकर्त्यांबरोबरच प्रेक्षकांनाही प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आपल्या सादरीकरणातून प्रबोधनपर संदेश देणारे विद्यार्थी एक प्रकारे शिक्षकाचेच काम करतात, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत केलेले सादरीकरण हे त्यांचे समाजभान जागृत असल्याचे निदर्शक आहे. निरोगी मन आणि शरीर यासाठी कला ही महत्त्वाची ठरते. समोरच्या सादरकर्त्याला दाद देणे ही सुद्धा एक कला आहे. ती सुद्धा मनापासून जोपासली पाहिजे.
यावेळी डॉ. तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद कसबे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. यावेळी डॉ. मदनलाल शर्मा, संग्राम भालकर, सुरेखा अडके आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹️सर्वच स्पर्धांना उत्तम प्रतिसाद
उद्घाटन समारंभानंतर राजर्षी शाहू सभागृहात दिवसभर सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन, समूहगीत स्पर्धा आणि लोकवाद्य वादन ताल उत्सव झाला. त्याचप्रमाणे रांगोळी आणि स्थळचित्रण स्पर्धा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात पार पडल्या. या सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
🔹महोत्सवात उद्या...
उद्या, बुधवारी (दि. २४) राजर्षी शाहू सभागृह येथे मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका या स्पर्धा होतील. रसिकांनी त्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

