महानगरपालिकेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास सहलीसाठी विमानातून भरारी
schedule06 Jan 26 person by visibility 170 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत शाळांमधून शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली असून आज हे विद्यार्थी विमानाने इस्रो अभ्यास सहलीसाठी रवाना होत आहेत.
प्रशासक तथा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या इस्रो संस्थेला भेट देण्यात येते. यावर्षी या भेटीचे तिसरे वर्ष असून या उपक्रमासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून, असा उपक्रम सातत्याने राबवणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे.
आज दुपारी महानगरपालिका मुख्य इमारत चौक येथून के.एम.टी. बसद्वारे विद्यार्थ्यांना विमानतळाकडे रवाना करण्यात आले. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना अभ्यासात सातत्य ठेवून शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी बनून देशाचे सक्षम नागरिक होण्याचे आवाहन केले. भविष्यातही गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इस्रोसारख्या संस्थांना विमान प्रवास घडवून आणला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही आपली भावना व्यक्त करत इस्रोची अभ्यास सहल ही आयुष्यातील अविस्मरणीय व प्रेरणादायी घटना असल्याचे सांगितले. या सहलीमुळे भविष्यात अधिक मोठे यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अभ्यास सहलीमध्ये एकूण २५ विद्यार्थी (१३ मुले व १२ मुली), २ मार्गदर्शक शिक्षक, १ शिक्षिका अधिकारी व १ महिला डॉक्टर असा एकूण २९ जणांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास, इस्रो येथे निवास व्यवस्था तसेच परतीच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी केले आहे.
सहलीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे ब्लेझर व बूट मोफत देण्यात आले आहेत. तसेच अग्निशमन विभागामार्फत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले असून शिक्षक संघटनेमार्फत बॅग व नोटपॅड यांसारख्या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांनी दिली.
या सहलीच्या यशस्वी नियोजनासाठी प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी तसेच लिपिक संजय शिंदे, क्रिडा निरिक्षक सचिन पांडव व शांताराम सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.

