विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन
schedule12 Jan 26 person by visibility 51 categoryराज्य
कोल्हापूर: शीख धर्माचे नववे धर्मगुरू श्री. गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक व सर्व सामान्य नागरिकांचा या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने इयत्ता 8 ते 12 वी या वर्गातील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या गटात निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी प्राण दिले .धर्मांतर सक्तीला शरण न जाता त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. त्यांच्या शौर्याचे,बलिदानाचे व देशाबद्दलचे मानवतावादी कार्य लक्षात घेऊन तसेच त्यांच्या पराक्रमाची व्यापक माहिती इतर समाजाला व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातर्फे अनेक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विभागीय माहिती कार्यालयातर्फे, " श्री गुरु तेग बहाद्दूर - यांचे जीवन कार्य " या विषयावर सुमारे 500 ते 600 शब्दात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्याच्या अनुषंगाने आकर्षक घोषवाक्य स्पर्धेचेही विविध गटात आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धकांनी आपला निबंध तसेच घोषवाक्य आपल्या नाव पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेल वर 20 जानेवारीपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. याबाबत काही अडचण आल्यास 0231-2662600 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विजेत्या स्पर्धकाला आकर्षक बक्षीस व सन्मानपत्र देण्यात येईल. तरी इच्छुकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले आहे.

