महात्मा जोतीराव फुले यांच्या शैक्षणिक विचारांची मौलिकता
schedule11 Apr 24 person by visibility 488 categoryसामाजिक

▪️महात्मा फुले जयंती निमित्त
महात्मा जोतीराव फुले हे पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे बहुजन समाजाचे कर्ते मार्गदर्शक व द्रष्टे विचारवंत होते. बहुजन समाज शिकला सवरला तरच तो स्वतःच्या जीवनात सावरू शकेल, शिक्षणाशिवाय त्याची होणारी फसवणूक, लुबाडणूक व अडवणूक थांबणार नाही, तसेच शिक्षणाशिवाय त्यांचा उध्दार होणार नाही, यांवर फुले यांचा प्रचंड विश्वास होता, त्यामुळे त्यांनी बहुजन समाजाला शिक्षण मिळावे म्हणून फार मोठा विरोध पत्करून शिक्षणप्रसार करण्याच्या कार्यावर भर दिला. समाजातील प्रचंड अज्ञान व अंधश्रद्धा या विरोधात दंड थोपटले.
गोरगरीब अज्ञानी जनतेचा गैरफायदा घेऊन त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक शोषण करणाऱ्या कुप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, अशी त्यांची विचारसरणी होती. हजारो वर्षे उच्चवर्णीयांकडून धर्म, जाती, पंथ या नावाखाली बहुजन समाजाला जे फसवले व नाडले जाते, त्यांवर उपाय म्हणजे शिक्षणाचा प्रसार होय, तेव्हा हा गोरगरीब बहुजन, शुद्र अतिशूद्र समाज शिकला तर सत्य असत्य यांची तो पारख करू शकतो, आणि आपले शोषण थांबवू शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
उच्चवर्णीयांनी शूद्रांना फसवून व लुटून त्यांचे संपूर्ण शोषण करुन, तसेच धर्माच्या नावावर राजकारण करुन आपले सातत्याने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वर्चस्व ठेवण्याचे कटकारस्थान हजारो वर्षे यशस्वी झाले, त्याचे मूळ कारण अज्ञान हेच होते, म्हणून शिक्षणाशिवाय त्यांनी व्यक्त केलेला विचार आजच्या काळात मूलमंत्र झाला आहे, तो असा..."विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली...!नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले...! वित्ताविना शूद्र खचले...!,इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले...!!".
शिक्षण हे अनेक समस्यांवरचे रामबाण औषध आहे ,असा त्यांचा शिक्षणाबद्दलचा ठाम विश्वास होता.त्यामुळेच त्यांनी पुण्यासारख्या कर्मठ व सनातनी विचारांचा प्रभाव असणाऱ्या शहरात धर्ममार्तंडांच्या प्रचंड विरोधाला तोंड देत, निर्भीडपणे कष्ट व परीश्रम घेऊन शूद्रांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शाळा सुरू केल्या. स्त्रीया शिकल्या पाहिजेत म्हणजे संपूर्ण कुटुंब सज्ञान होते या विचाराने त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुणे शहरात पाया रचला.
महात्मा फुले यांची शिक्षणाबद्दलची आस्था व तळमळ त्यांच्या कार्यातून व विचारातून महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पोहोचली.त्यांच्या शिक्षणाविषयी विचारांची छाप त्यांच्या नंतरच्या काळातील विचारवंतांच्या विचारसरणीवर पडली आणि नंतरच्या काळात अनेकांनी त्यांचे विचार पुढे नेले. अर्थात त्यांच्या शैक्षणिक विचारांचे पुरोगामित्व आणि द्रष्टेपण अधोरेखित झाले आहे.
महात्मा फुले यांनी शिक्षणासंबंधीचे विचार मांडले त्या गोष्टीला शंभर वर्षाहून अधिक काळ लोटला, तसेच महात्मा फुले यांच्या काळातील परिस्थिती आणि सद्याची परिस्थिती यामध्ये राजकीय, आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे, मात्र महात्मा फुलेकालीन राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक परिस्थितीची दाहकता लक्षात घेऊन आविष्कृत झालेले त्यांचे शैक्षणिक विचार व या विचारांचे महत्त्व आजही तितकेच महत्त्वाचे व आवश्यक आहे. शिवाय २१ व्या शतकात महात्मा फुलेंच्या विचारांचे महत्त्व व मौलिकता अधिकाधिक प्रकर्षाने प्रत्ययास येते, ही वस्तुस्थिती कुणाला ही नाकारता येणार नाही.
याचे कारण म्हणजे महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण अनिवार्य करण्यापासून ते प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, प्राथमिक शिक्षणाचे पर्यवेक्षण आणि प्राथमिक शिक्षणाचा लाभ घेतलेल्या शूद्र बांधवांकडून असलेल्या अपेक्षा इथपर्यंतचा मुलभूत विचार त्यांनी मांडलेला होता.
त्यांच्या काळातील प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीबद्दल त्यांनी मांडलेला विचार असा की, "या इलाख्यात सर्वसाधारण जनतेच्या प्राथमिक शिक्षणाची खूपच हेळसांड झालेली आहे,यात तिळमात्र शंका नाही. काही वर्षांपूर्वीच्या मानाने या इलाख्यातील प्राथमिक शाळांची संख्या वाढलेली असली, तरी समाजाची गरज भागविण्याच्या दृष्टीने ती मुळीच पुरेशी नाही... या प्रांतातील नऊ दशांश गावांना म्हणजे जवळजवळ दहा लाख मुलांना प्राथमिक शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध केलेली नाही असे सांगितले जाते."
महात्मा फुले यांनी यांनी वर्णन केलेली प्राथमिक शिक्षणाची ही स्थिती इ. स. १८८२ सालातील असून ती फक्त मुंबई इलाख्यापुरतीच मर्यादित आहे. परंतु आज शतकानंतर ही महाराष्ट्रातील आणि देशातील ही स्थितीमध्ये कालमानानुसार पडलेला फरक लक्षात घेता प्राथमिक शिक्षणाची स्थिती फारशी समाधानकारक नाही, हे वास्तव आहे. तथापि महात्मा फुले यांचे मोठेपण हे की, त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या स्थितीचे केवळ वर्णन केले नाही, तर त्यांवर मात करण्यासाठी त्यांनी मौलिक सूचना व उपाय सुचवले, त्यापैकी सक्तीचे प्राथमिक शिक्षण ही उपाययोजना अत्यंत महत्त्वाची आहे. महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा जो आग्रह धरला होता, यावरून त्यांचे शिक्षणाविषयीचे द्रष्टेपण अधोरेखित झाले आहे. इ. स. १८८२ च्या भारतीय शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात ते म्हणाले, " काही ठराविक वयोमर्यादेपर्यंत, निदान वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात यावे असे माझे मत आहे."
महात्मा फुले यांचा हा विचार नंतरच्या काळात बडोदा संस्थानचे अधिपती सयाजीराव गायकवाड, करवीर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू छत्रपती महाराज, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणप्रेमी डॉ. पंजाबराव देशमुख यासारख्या समाजधुरीणांनी समाजासमोर मांडला. शिवाय केवळ विचार मांडून न थांबता महात्मा फुले यांच्या विचारांच्या परीपूर्तीसाठी प्रत्यक्ष कृती केली. भारत सरकारने २६ ऑगस्ट २००९ इ. रोजी प्राथमिक शिक्षणाचा हक्क मान्य तर केलाच शिवाय कायदा ही केला. यावरून इ. स. १८८२ मध्ये भारतीय शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा आग्रह धरणाऱ्या आणि हा विचार मांडणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांच्या शैक्षणिक विचारांचे महत्त्व, व द्रष्टेपण तसेच मौलिकता महत्त्वाची ठरते.
✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)