जिल्ह्याचा सर्वंकष क्रीडा कृती आराखडा तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule24 Jul 25 person by visibility 321 categoryराज्य

• जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा संघटनांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करावेत
• जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत
कोल्हापूर : जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सामाजिक दायित्व निधी, शासनाचे अनुदान, केंद्र व राज्य शासनाच्या योजना यांतून मोठ्या प्रमाणात निधी उभारुन क्रीडा विकासाला चालना द्या. जिल्हाधिकारी, महानगरपालिकेच्या आयुक्त, क्रीडा विभाग व जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी समन्वय साधून जिल्ह्याचा 'क्रीडा विकास आराखडा' तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी क्रीडा प्रतिष्ठाण सोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी क्रीडा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, उपअभियंता हेमा जोशी, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार विविध खेळांशी संबंधित संस्था व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. याचसाठी हॉकी स्टेडियम, गांधी मैदान, शिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालय, सासणे ग्राउंड अशी मैदाने व शहरातील जलतरण तलावांना आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन शहरातील मैदाने व जलतरण तलाव खेळाडू व सर्वसामान्य युवकांसाठी लवकरात लवकर खुली करावीत.
जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी व सर्व संघटनांनी एकत्रित बैठक घेवून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, क्रीडा विकास आराखडा तयार करताना खेळाडू केंद्रबिंदू माना व जिल्ह्यातील क्रीडा संघटनांच्या सूचना विचारात घ्या. विभागीय क्रीडा संकुलात विविध खेळांची प्रशिक्षण केंद्रे निर्माण करा. तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळांच्या स्पर्धा आयोजित करता येतील, अशा पद्धतीने मैदानांचा विकास करा, अशा सूचना पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सी.एस.आर. निधी मधून क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. राज्य व जिल्ह्यातील औद्यागिक प्रतिष्ठाने, कंपन्यांचे सहकार्य घेवून निधी उभारण्याचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.
क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूर या नावाने जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी एकत्रित येवून संस्था स्थापन केली आहे. शहराचा विकास साधताना क्रीडा बाबींना अधिक महत्व देणे गरजेचे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात खेळाला महत्व दिले असून, क्रीडा संघटनांशी समन्वय साधून जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्याचा क्रीडा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुढील 20 ते 25 वर्षांचा विचार करणे आवश्यक आहे. खेळ निहाय तांत्रिक बाबी, प्रशिक्षणाला आवश्यक सुविधा, तसेच क्रीडा क्षेत्रात स्पोर्ट्स सायन्सचे महत्व या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. आगामी काळात विभागीय क्रीडा संकुलात क्रीडा विषयक सोयी सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. स्पोर्ट्स हॉस्टेल, अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक, फिफा स्टँडर्ड फुटबॉल मैदान तयार करण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल, असे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी सांगितले.
बैठकीला लॉन टेनिस असोसिएशनचे दिलीप मोहिते, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख शरद बनसोडे तसेच आनंद माने जलतरण, मोहन भांडवले हॉकी, अमर ससाणे, राजन उरुणकर खो खो, विनय जाधव फेन्सिंग, प्रकुल मांगोरे पाटील अथलेटिक्स, भारत चौगले बुद्धिबळ, संजय तोरस्कर जिमनॅस्टिक, डॉ.राम पवार ज्युदो, डॉ.राजेंद्र रायकर बास्केटबॉल, मंगेश कराळे बॉक्सिंग, दिग्विजय माळगे टेबल टेनिस, शिवाजी पाटील व्हॉलीबॉल, शिवतेज खराडे शूटिंग तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थिती होते.