अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
schedule16 Jun 26 person by visibility 132 categoryमहानगरपालिका
मुंबई : राज्यातील रुग्णांना जीवनावश्यक औषधे व उपचार अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त उपलब्ध प्लाझ्माचा प्रभावी वापर करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विषयांवरील आढावा बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील रक्तपेढ्यांमधील अतिरिक्त प्लाझ्माच्या वापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या सुमारे ४५० रक्तपेढ्या कार्यरत असून त्यापैकी ७९ शासकीय क्षेत्रातील आहेत. उर्वरित रक्तपेढ्या खासगी व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जातात. शासकीय क्षेत्रात सुमारे २५ हजार लिटर अतिरिक्त प्लाझ्मा उपलब्ध असून खासगी क्षेत्रात हे प्रमाण तीन लाख लिटरपेक्षा अधिक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या अतिरिक्त प्लाझ्माचा उपयोग करून हिमोफिलिया, थॅलेसेमिया तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक औषधनिर्मितीची क्षमता विकसित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.
याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा आढावा, समित्यांच्या कार्यपद्धतीतील सुधारणा, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची तयारी, गोंदिया येथील प्रकल्पांची प्रगती, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील मनुष्यबळाची उपलब्धता, दंत महाविद्यालय व सभागृह उद्घाटन कार्यक्रमांचे नियोजन तसेच विविध वैद्यकीय संस्थांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भातील विषयांवरही चर्चा करण्यात आली.
बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध प्रस्तावांवर सकारात्मक दृष्टीकोनातून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.