शाहू जयंतीनिमित्त कार्यक्रमांतून राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य रुजवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule25 Jun 25 person by visibility 270 categoryराज्य

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाच्या सांगता वर्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पंधरवड्यानिमित्त घेण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांतून शाहू महाराजांचे विचार व कार्य रुजवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव 2024 ची सांगता सन 2025 मध्ये करण्यात येत आहे. दिनांक 26 जून ते 10 जुलै 2025 पर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सर्व क्षेत्रातील कार्य अद्वितीय आहे. शाहू महाराजांच्या जयंती पंधरवड्यानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतून व विविध स्पर्धांमधून शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा संदेश सर्वदूर पोहोचवा. तसेच सर्व संबंधित विभागांनी जिल्हा व तालुका स्तरावर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे चोख नियोजन करा. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर आधारित व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धांचे, विजेत्यांच्या निवडीचे व गुणगौरव कार्यक्रमाचे योग्य नियोजन करा. सर्व स्पर्धांसाठी शाहू महाराजांच्या विचार, कार्यावर आधारित विषयांची निवड करा. कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन घ्या. महासमाधान शिबिर, तालुका पर्यटन मेळाव्याचे तालुका स्तरावर नियोजन करा. पर्यटन मेळाव्यातून त्या त्या तालुक्यातील पर्यटनस्थळांची माहितीची प्रचार, प्रसिद्धी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी दिल्या.
संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतची माहिती बैठकीत दिली.