औषध निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी गरजेची : डॉ. एम. व्यंकट रमणा
schedule30 Jan 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक
▪️‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ कार्यशाळा
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजन
कोल्हापूर " औषध निर्मिती आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी, त्यांचे ताणतणाव कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रयोगांचे अचूक व पुनरुत्पादक निष्कर्ष मिळवण्यासाठी नैतिक मुल्ये आणि कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी. औषध निर्मिती आणि त्यांचा सुरक्षित वापर याबद्दल जनजागृती करण्यासाठी फार्मसी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाचे (दक्षिण विभाग) उपाध्यक्ष डॉ. एम. व्यंकट रमणा यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्यावतीने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित ‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय प्रायोगिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, डॉ. रविकांत पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. एम वेंकट रमणा म्हणाले, डी. वाय. पाटील विद्यापीठाने या कार्यशाळेच्या माध्यमातून आव्हानात्मक आणि महत्वाच्या विषय हाती घेतला आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वतःला अपडेट करा, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी केले. देशभरात ५ हजार पेक्षा जास्त फार्मसी कॉलेज असून येथून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची औषध निर्माण क्षेत्रात महत्वाची भूमिका राहणार आहे. अत्याधुनिक पद्धतीचा वापर, प्रायोगिक ज्ञान, शिक्षण, संवाद, चर्चा या कार्यशाळेत होणार असून विद्यार्थी व संशोधक याना नवे ज्ञान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे म्हणाले, फार्मसी क्षेत्र हे मेडिकल क्षेत्राशी सर्वात जवळ आहे. प्राण्यांवर करण्यात येणाऱ्या प्रयोगामधूनच यशस्वी औषध निर्मिती होते. त्यानंतरच मनुष्यावर वापर केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेत महत्वाच्या असलेल्या प्रायोगिक प्राण्यंची हाताळणी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आपल्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी अधिक संपन्न बनविण्यासाठी हि कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरेल.
डॉ. आर. वाय पाटील म्हणाले, निसर्गातील प्राण्यांच्या प्रत्येक जाती एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांच्या जीवनपद्धतीचे बारकावे समजून घेणं आणि सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचे आहे.
कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी, मानवी आरोग्यासाठी प्रयोग गरजेचे आहेत, पण नियमावली काटेकोर पालन करणेही आवश्यक आहे. प्रयोगासाठी प्राण्याचा वापर करण्यापूर्वी याऐवजी दुसरा पर्याय आहे का? त्याच प्राण्याचा पुनर्रवापर करता येइल का? आणि प्रयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्याला कमीत कमी वेदना व्हाव्यात यासाठी काय करू शकतो हे तीन प्रश्न विचारा.
दोन दिवशीय या कार्यशाळेत डॉ. प्रल्हाद वांगीकर, डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. आर. वाय. पाटील, डॉ. मिता बुरांडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. देवेंद्र शिरोडे, डॉ. स्मिता सदर, डॉ. विश्वेश डांगे यांनी प्रात्यक्षिक सादर केली. शनिवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉ. बलवंत चौरे, डॉ. ए. जी. ढवळशंख, डॉ. रविंद्र जरग, डॉ. संदीप पाटील, डॉ. चंद्रगौंडा पाटील हे मार्गदर्शन करणार असून डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. संतोष वाळवेकर, डॉ. संदीप पाटील, डॉ. देवेंद्र शिरोडे, डॉ. स्मिता सदर हे प्रात्यक्षिक घेणार आहे.
डॉ. सोनाली दिवटे आणि स्नेहल भोंगाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार डॉ. अभिनंदन पाटील यांनी मानेल. यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सी.डी लोखंडे, डॉ. अमृतकुवर रायजादे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. उमराणी जे. , रुधीर बार्देसकर, संजय जाधव, अजित पाटील, जयदीप पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, देशभरातून उपस्थित विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते.