पुणे पदवीधर पुरवणी मतदार नोंदणीत कोल्हापूर पिछाडीवर; पदवीधरांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्याचे माणिक पाटील-चुयेकर यांचे आवाहन
schedule06 Jun 26 person by visibility 145 categoryसामाजिक
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी सुरू असलेल्या पुरवणी मतदार नोंदणी प्रक्रियेत कोल्हापूर जिल्हा सध्या पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. ३१ मे २०२६ अखेरपर्यंत प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोल्हापुरातून केवळ ४९५ पात्र पदवीधरांनी आपली नोंदणी केली आहे.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरची ही नोंदणी संख्या लक्षणीयरीत्या कमी आहे. याच कालावधीत पुरवणी मतदार यादीत पुणे जिल्ह्यातून ३,७४९, सातारा जिल्ह्यातून १,८३७, सोलापूर जिल्ह्यातून १,४१० आणि सांगली जिल्ह्यातून ६१० पात्र पदवीधरांनी नोंदणी पूर्ण केली आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबर २०२६ च्या सुरुवातीला होणार असून, निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम ऑक्टोबर २०२६ मध्ये जाहीर होईल. तत्पूर्वी, १२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मुख्य मतदार यादीत कोल्हापूर जिल्हा ९१,४०० मतदारांसह पहिल्या क्रमांकावर होता. हे अव्वल स्थान कायम राखण्यासाठी आता पात्र पदवीधरांनी मोठ्या संख्येने नोंदणी करणे गरजेचे आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत पुरवणी मतदार यादीत पात्र पदवीधरांना आपली मतदार नोंदणी करता येणार आहे. कोल्हापूरचे हे प्रथम स्थान टिकवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी मोठ्या संख्येने पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन 'पदवीधर मित्र'चे संस्थापक व अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.