सभासदांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये जमा करणार : चेअरमन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घोषणा; शरद सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा
schedule02 Sep 26 person by visibility 18 categoryसामाजिक
नरंदे : शरद साखर कारखान्याकडून मागील वर्षाच्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा २६३ रुपये दर जादा दिला आहे. तर ३५०० पैकी दुसरा १०० रुपयाचा हप्ता आठ दिवसात उत्पादकांच्या खात्यावर जमा करणार आहे. अशी माहिती शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पार पडली. प्रारंभी संस्थापक शामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक एम. एम. पट्टणकुडे यांनी अहवाल वाचन केले.
विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली. यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम कालावधी सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकासह कामगार यांच्या समन्वयाने आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी तोडणी आणि वाहतूक यंत्रणा सक्षम केली आहे. साखर, उपपदार्थ, डिस्टलरी, सहवीज प्रकल्पातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नसल्याने कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणे आवश्यक आहे. कारखाना आणि शेतकरी दोघांनाही स्पर्धेत टिकण्यासाठी एआय तंत्रज्ञान स्वीकारणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञान वापरल्यास एकरी दहा ते वीस टन ऊस उत्पादन वाढू शकते. ऊस उत्पादकांनी भविष्यात एआय तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. यावेळी सभासदांच्या लेखी प्रश्नांना चेअरमन यड्रावकर यांनी उत्तरे दिली.
यावेळी मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कारखान्याच्या वतीने धनादेशाचे वाटप करण्यात आले. शहीद जवानासह अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत संचालक संजय नांदणे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन थबा कांबळे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, संचालक आदित्य पाटील यड्रावकर, डी. बी. पिष्टे, अभिजीत भंडारी, आप्पासो चौगुले, बाबगोंडा पाटील, दिलीप पाटील, केशव राऊत, बाबा पाटील, कुरुंदवाड चे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, दादासो पाटील, अक्षय आलासे, संचालक सुभाष सिंग रजपूत, गुंडा इरकर, रावसाहेब चौगुले, रावसाहेब कुंभोजे, विद्यासागर मरजे, शिवगोंड पाटील, अण्णासाहेब सुतार, अजित उपाध्ये, यांचेसह बाळासो पाटील, अरुण पाटील, अजय पाटील, रवींद्र अनुसे, बी.ए.आवटी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, शाहू आघाडीचे सदस्य जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेचे नगरसेवक, सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार पोपट भोकरे यांनी मानले.