जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला हलवू नये; सतेज पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे मागणी
schedule01 Sep 26 person by visibility 248 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेज पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत पुणे येथे स्थलांतरित करू नये, अशी मागणी केली आहे.
याबाबत त्यांनी जलसंपदा मंत्र्यांना पत्र देऊन कोल्हापूर येथे हे कार्यालय असण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच मोठ्या प्रकल्पांवर गतीने नियंत्रण ठेवण्यासाठी हे कार्यालय कोल्हापुरात सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील हजारो शेतकरी व सिंचन योजनांच्या प्रश्नांसाठी या कार्यालयाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना दरवर्षी महापुराचा मोठा फटका बसतो. अशा संवेदनशील काळात धरणातून पाणी सोडण्याबाबतच्या निर्णय प्रक्रियेसाठी मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापुरात असणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.