कोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई!
schedule01 Sep 26 person by visibility 11 categoryराज्य
*४०२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; ३ लाख ८ हजारांचा दंड वसूल
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडून मनमानी करणाऱ्या आणि वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा व शहर परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वतीने आज दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी एक विशेष मोहीम राबविण्यात आली. या धडक मोहिमेत तब्बल ४०२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ३,०८,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी १०.३० ते १२.३० तसेच सायंकाळी १७.०० ते १८.३० या वेळेत ही कारवाई पार पडली. शहरातील महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, सायबर चौक व खरी कॉर्नर या प्रमुख व गर्दीच्या ठिकाणांवर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हा विशेष बंदोबस्त व तपासणी मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान अल्पवयीन वाहन चालक, तिप्पट सीट वाहने चालवून हुल्लडबाजी करणारे, वाहनांचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणारे, फॅन्सी नंबर प्लेट लावणारे तसेच सिग्नल जंप करणाऱ्या वाहनधारकांना विशेषरीत्या लक्ष्य करण्यात आले.
◼️कारवाईची सविस्तर आकडेवारी:
* तिब्बल सीट: २२ केसेस | दंड: २२,०००/-
* वाहन चालविताना मोबाईलचा वापर: १६ केसेस | दंड: २५,०००/-
* विहीत नमुन्यात नंबर प्लेट नसणे: ४४ केसेस | दंड: ३६,०००/-
* फॅन्सी नंबर प्लेट: २ केसेस | दंड: १,५००/-
* वाहनामध्ये मॉडिफिकेशन करणे: ३ केसेस | दंड: ३,०००/-
* सिग्नल जंप करणे: ४८ केसेस | दंड: २८,०००/-
* लायसन्स जवळ न बाळगणे: १०९ केसेस | दंड: ७४,५००/-
* लायसन्स न काढणे: ४ केसेस | दंड: २०,०००/-
* प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे: ३८ केसेस | दंड: २४,०००/-
* कर्कश हॉर्न: ९ केसेस | दंड: ७,५००/-
* इतर केसेस: १०७ केसेस | दंड: ६६,५००/-
* एकूण: ४०२ केसेस | एकूण दंड: ३,०८,०००/-
ही धडक मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रिया पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग), नंदकुमार मोरे (पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा), संतोष डोके (पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे), श्रीराम कन्हेरकर (पोलीस निरीक्षक, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे), विकास जाधव (पोलीस निरीक्षक, राजारामपुरी पोलीस ठाणे), किरण लोंढे (पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा पोलीस ठाणे) तसेच शहर वाहतूक शाखा व विविध पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.