जवाहर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान
schedule29 Nov 24 person by visibility 198 categoryउद्योग
इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे हुपरी पोलीस ठाण्याच्या, वतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी वाहनचालकांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
ऊस बैलगाडी, अंगद ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या बाजूस पांढर्या व मागील बाजूस लाल रंगाची रिफ्लेक्टर पट्टी व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे, त्यामुळे रस्त्यावरील अपघात टाळून सर्वांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होते. वाहनांमध्ये क्षमते एवढाच ऊस भरावा. ऊस वाहतूक करताना मोबाईलचा वापर करू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, रिकामे वाहन बेदरकारपणे चालवू नये,
तसेच ऊस वाहतूक वाहनात टेपरेकॉर्डर व स्टेरिओचा वापर करु नये, वाहनांची आरटीओ कागदपत्रे, वाहनाचा विमा व वाहनचालकाचा परवाना अद्ययावत असणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाची तसेच ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादीची नियमीत देखभाल ठेवावी जेणेकरून आपल्या वाहनांतील बिघाडामुळे अपघात होणार नाहीत आदी सूचना केल्या. त्याचबरोबर हुपरी गावातून रूई व पट्टणकोडोली मार्गे ऊस भरून येणारी वाहने आणि कारखान्यावरून रिकामी होवून जाणार्या वाहनांची वाहतूक ही बायपास मार्गानेच करणेची आहे. नियमांचे पालन करून रस्त्यावरील ऊस वाहतूक सुरळीत ठेवून आपले व सामान्य नागरिकांचे अनमोल जिवन सुरक्षित ठेवण्याचे महत्वाचे काम करावे, असे आवाहन सरगर यांनी केले.
स्वागत कारखान्याचे संचालक सुरज बेडगे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये व्हाइस चेअरमन बाबासो चौगुले यांनी, कारखान्यामार्फत प्रतिवर्षी सुरक्षित ऊस वाहतूक अभियानाद्वारे वाहनांना कारखान्याकडून रिफ्लेक्टर व रिफ्लेक्टर पडदे पुरविले जात असल्याचे सांगत वाहनधारकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. या अभियानासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, सहा. पोलीस उपनिरीक्षक विजय कनाके, कॉन्स्टेबल एकनाथ भांगरे, जनरल मॅनेजर अॅडमिन, उपमुख्य शेती अधिकारी, फॅक्टरी मॅनेजर, मॅनेजर एच.आर., मेडीकल ऑफीसर, केनयार्ड सुपरवायझर, सुरक्षा अधिकारी आणि ऊस वाहतूक वाहन मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेफ्टी ऑफीसर यांनी आभार मानले.