सामाजिक भान... ' एकटी ' संस्थेचा आजोबांना ' आधार '
schedule27 Jan 26 person by visibility 87 categoryसामाजिक
कोल्हापूर : शाहू छत्रपती महाराज अर्थात थोरले महाराज यांचे मुख्य चोपदार आणि भवानी मंडप गाळेधारक सहकारी उदय बोन्द्रे आणि टी स्टॉल वाले सुभाष सुर्वे हे दोघे एका वयस्कर आजोबांना आज मंगळवारी सकाळी मायेने आणि आपुलकीने कांदा पोहे खाऊ घालताना आणि चहा पाजत असल्याचे पत्रकार नवाब शेख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चौकशी केली असता हे लवटे नावाचे आजोबा सावंतवाडी येथील असल्याचे समजले.
कोल्हापुरातील एका व्यवसायिकाकडे ते कांदा कापण्याचे काम करत होते. वयोमानानुसार काम करता येत नव्हते. शरीर थकले होते. त्यामुळे काम सोडून ते मूळ गावी गेले होते. पण काहीही कामधंदा करता येत नसलेल्या वयस्कर वडिलांना शरीर थकलेले असताना त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असताना मुलांनी त्यांना घराबाहेर काढल्याने ते परत कोल्हापूरला आले.
लवटे आजोबा भवानी मंडपात बसलेले पाहून समाजभान जपत उदय बोन्द्रे आणि सुभाष सुर्वे यांनी या आजोबांची घेतलेली काळजी आणि दाखवलेली सहानुभूती पहाता पत्रकार नवाब शेख यांनी तातडीने ' अवनी ' संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले याच संस्थेची भगिनी संस्था असलेल्या ' एकटी ' संस्थेचे जैनुद्दीन पन्हाळकर, अभिजित कांबळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. संस्थेचे टीम मेंबर त्वरित भवानी मंडपात व्हॅन घेऊन पोहोचले लवटे आजोबांची माहिती घेऊन सोपस्कार पूर्ण करून घेऊन ' आजोबांना घेऊन गेले. संस्थेच्या शिरोली नाका येथील ' शेल्टर ' मध्ये आता त्यांना हक्काचा निवारा मिळेल.