SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समूहभावाचे खेड्याचे जीवनतत्व भंगल्यानेच सामाजिक प्रश्र्न वाढले : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महानगरपालिका : महापौर पद व इतर सर्व पद विभागणीबाबत निर्णय उद्या; महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठकलढणार्‍यांना पाठबळ द्या : रमेश गावस; विद्यापीठात पर्यावरण आणि प्रसारमाध्यमे विषयावर कार्यशाळानिवडणूक काळात कोणत्याही प्रकारची अनियमितता नको : जिल्हाधिकारी अमोल येडगेमाहिती विभागाचे छायाचित्रकार यमकरांचा निवृत्ती निमित्त सत्कारकोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंचे आरोग्य शिबीर व लसीकरण सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या; शपथविधी संपन्नसुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

जाहिरात

 

समूहभावाचे खेड्याचे जीवनतत्व भंगल्यानेच सामाजिक प्रश्र्न वाढले : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस

schedule31 Jan 26 person by visibility 153 categoryसामाजिक

▪️ विश्वास पाटील यांच्या 'फेरा जन्म मृत्यूचा' पुस्तकाचे शानदार  सोहळ्यात प्रकाशन

कोल्हापूर : समूहभाव आणि सहानुभाव हे खेड्याचे जीवनतत्व आहे. निसर्गाचे सानिध्य असेल तर गाव आहे. पण आता खेड्यात जन्माला आलेला नवीन मध्यमवर्ग संवेदनशून्य आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

येथील शाहू स्मारक भवन येथे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विश्वास सावित्री शामराव पाटील यांनी लिहिलेल्या 'फेरा जन्म मृत्यूचा' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गवस यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले अध्यक्षस्थानी होते. लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, प्रकाशक भाग्यश्री पाटील, साताऱ्याच्या महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील प्रमुख उपस्थित होत्या. 

 एखाद्या प्रकाशन सोहळ्याला समाजातील इतके चांगले लोक उपस्थित राहतात हे लेखक विश्वास पाटील यांच्या समाजशील पत्रकारितेचे फलित असल्याचे राजन गवस यांनी सांगितले.
डॉ. गवस म्हणाले, 'इंग्रजांच्या काळात अक्षर म्हणजे ज्ञान अशा शिक्षणाचा प्रसार झाला. त्यातून गावगाड्याचे जीवन बहिष्कृत झाले. चांगले-वाईट हे त्या त्या गावावरुन समजले जाते, ते त्या गावचा समूहभाव आहे. या जोरावरच खेडं उभे राहिले, पण त्यांच्याकडे अडाणी म्हणून पाहू लागलो. ग्रामीण माणूस आजपर्यंत गायी-म्हैशी, कुत्रे, मांजर अशा सगळ्यांना सोबत घेवून जगत आला आहे. गाव एक समूह आहे आणि पशु-पक्षी जगली पाहिजेत, जंगली वाचली पाहिजेत. तरच जगण्याला अर्थ आहे. किड्या मुंग्याना जेवढा जगण्याचा अधिकार तेवढाच मलाही अधिकार या सहानुभावावर खेडी उभी राहिली परंतू आता लोकांना कुत्रे-मांजरही नको झाली आहेत आणि आईवडिलही. चंगळवादाकडे झुकलेला व संवेदनाशून्यू असा जो नवमध्यमवर्ग निर्माण झाला, त्यांनी समूहभाव आणि सहानुभावची जबाबदारी नीट पार पाडली नाही. 

या नवमध्यमवर्गाने 'आतला-बाहेरचा' गावगाडाच समजून घेतला नाही. यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले. सध्याची सामाजिक स्थिती, बदलते ग्रामजीवन, आत्मकेंद्रित नव मध्यमवर्ग यावर ऊहापोह करताना ते म्हणाले,' गाव हा एक समूह आहे. जे जे असेल ते गावचे, समूहाचे. या समूहभाव आणि सगळयासहित जगण्याचा सहानुभाव हा ग्रामजीवनाचा, खेडयांचा मूळ स्वभाव आणि मूलतत्व. मात्र आंग्ल संदर्भातील शिक्षणातून जो वर्ग तयार झाला. त्यांनी खेडी किती समजून घेतली ? त्यांना गावगाडा किती समजला. प्रत्येक गावगाडयामध्ये एक गाव आत असतो, एक गाव बाहेर असतो. आतला बाहेरचा हा गावगाडा समजून घ्यायला हवा होता. मात्र नव मध्यमवर्गाने साऱ्यांनाच अंतरावर ठेवले. 

ज्येष्ठ संपादक वसंत भोसले म्हणाले, वाचकांना काय आवडेल हे पाहून वृत्तपत्रात लिहिण्याची पध्दत आली, परंतु समाजात जे बदल घडताहेत ते सांगण्याचा, प्रसंगी त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला, त्याला वाचकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. लाेकशाही बळकट करणे हे माध्यमांची ताकद आहे. जे समाजहिताचं आहे, कसदार आहे. त्याच्या पाठीशी समाजाने उभं राहावे. विश्वास पाटील यांनी समाजहित केंद्रस्थानी ठेवून बंडखोरी वृत्तीने प्रबोधनात्मक लिखाण केले आहे. निश्चितच ते समाजाला उपयुक्त ठरणारे आहे.


पुस्तकामागची भूमिका मांडताना विश्वास पाटील म्हणाले, श्रध्दा ही अंधश्रध्देच्या वाटेवर चालू लागली आहे. पण समाजाचा रेटा वाढला तर समाजात बदल घडू शकतो. कर्मकांड, अंधश्रद्धा, खोटी प्रतिष्ठा यामुळे समाज जीवनावर होणारा परिणाम हा अस्वस्थ करणारा आहे. समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वतः पासून करायला हवी. समाजात शिक्षित, नवमध्यमवर्ग जो तयार झाला आहे तो कर्मकांड व अंधश्रद्धेत गुरफटत आहे. श्रद्धा जरुर असावी, पण अंधश्रद्धा व कर्मकांडाकडे झुकू नये. समाजातील ढोंगीपणा, दांभिकतेवर शाब्दिक प्रहार करताना समाजातील चांगुलपणा, बदलाचे वारे नेमकेपणाने टिपत ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांचेही यावेळी भाषण झाले. प्रकाशक भाग्यश्री पाटील-कासोटे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी आभार मानले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes