दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीम
schedule06 Nov 26 person by visibility 120 categoryराज्य
◼️२० नोव्हेंबरपर्यंत तपासणी; जादा भाडे आकारल्यास कारवाई
कोल्हापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजीमार्फत खासगी कंत्राटी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती इचलकरंजीच्या सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांढेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या मोहिमेदरम्यान विना परवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे, परावर्तिका, इंडिकेटर, टेललाईट व वायपरची स्थिती आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. तसेच वाहनांमध्ये केलेले बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खातरजमा, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन निर्गमन दरवाजा व इतर दरवाजांची कार्यक्षमता अशा एकूण ११ प्रमुख बाबींची तपासणी केली जाणार आहे.
कंत्राटी प्रवासी बसधारकांनी शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारू नये. जादा भाडे आकारणी केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास किंवा जादा भाडे आकारल्यास प्रवाशांनी आरटीओच्या 02302990051 या व्हॉट्सॲप क्रमांकावर अथवा mh51.forhptr@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.