संवादातून आणि समन्वयातून उसाच्या दराचा कोंडीचा प्रश्न सुटला: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
schedule06 Nov 26 person by visibility 153 categoryराज्य
◼️ साखर हंगाम सुरू होणे ही काळाची गरज; शेतकरी संघटना आणि नेत्यांचे मानले आभार
◼️ आमच्या पक्षात अंतर्गत कुरबुरी नाहीत, सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत: मुश्रीफ
◼️ गोकुळमध्ये विरोधकांचा जनादेश, चेअरमन निवडीत अडवणूक नाही; 'त्यांनी' विजयाचा उन्माद करू नये
कागल : राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्यामुळे प्रवाशांची, दिवाळीनिमित्त ये-जा करणाऱ्या महिला व मुलांची मोठी परवड होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवलेल्या जबाबदारीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटनांचे शिष्टमंडळ व अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा केली. संवादातून आणि समन्वयातून अखेर ऊस दराबाबतचा हा तोडगा निघाला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागल येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तोडगा मान्य करून आंदोलन मागे घेतल्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्व शेतकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे मंत्री मुश्रीफ यांनी मनापासून आभार मानले.
"पाण्याअभावी शेतकऱ्यांचा ऊस वाळत होता, तोडणी-ओढणी मजूर हवालदिल झाले होते आणि आंदोलनाचे लोण कर्नाटकातही पसरले होते. त्यामुळे या घडीला साखर हंगाम सुरू होणे अत्यंत गरजेचे होते," असे त्यांनी स्पष्ट केले.
◼️अमित शाह यांची भेट शेतकरी व बँकिंगच्या प्रश्नांसाठी
पक्षामध्ये सर्व काही आलबेल असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष दमदारपणे वाटचाल करत असल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, "दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट राजकीय कारणासाठी नव्हती. १० वर्षांचा बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट, साखरेची एमएसपी वाढवणे आणि इथेनॉलचे दर वाढवणे या मागण्यांसाठी मी व दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांची भेट घेतली."
◼️ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर उत्तर देताना ते म्हणाले की, या चर्चेला आधीच पूर्णविराम मिळाला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती. राजकीय पक्ष वेगळे असले तरी जुने ऋणानुबंध कायम आहेत.
◼️गोकुळ दूध संघाचा डेडलॉक आणि सतेज पाटलांवर टीका
गोकुळ दूध संघाबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी सतेज (बंटी) पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "बंटी पाटील यांनी फेक सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषयाचा विनाकारण गवगवा केला. गोकुळमध्ये समविचारींचे १३ तर महायुतीचे १२ संचालक आहेत. बायलॉजप्रमाणे कोरम १४ चा असल्याशिवाय अध्यक्ष निवड होऊ शकत नाही. आम्हाला विरोधकांचा जनादेश मिळाला आहे, त्यामुळे आमच्या लोकांनी बैठकीला जाऊन त्यांचा कोरम पूर्ण करावा ही अपेक्षा योग्य नाही. आम्ही त्यांची कोणतीही अडवणूक केलेली नाही, त्यांनी जाऊन अध्यक्ष निवडावा," असे मुश्रीफ म्हणाले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चेची वेळ आता निघून गेली असल्याचे सांगताना मुश्रीफ म्हणाले, "विजय-पराजय होत असतात, पण विजयाचा इतका उन्माद नको की मुख्यमंत्र्यांचा आणि आमचा अपमान केला जाईल. मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे. आम्ही अजितदादांसोबत महायुतीत गेलो आणि ते काँग्रेसमध्ये राहिले, मग यात कसली गद्दारी?" असा सवालही त्यांनी केला.
◼️न्यायालयाच्या निकालाने आमचीही दिवाळी गोड
ईडीकडून झालेल्या निर्दोष मुक्ततेबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानले. "२०२२ पासून माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्सच्या तांत्रिक मुद्द्यांवरून केस सुरू होती. न्यायालयाने क्लीन चिट दिल्याने आमचीही दिवाळी गोड झाली आहे," असे त्यांनी सांगितले. ट्रोलिंगबाबत बोलताना ही न्यायालयीन प्रक्रिया दीर्घकाळ सुरू होती आणि त्याचा निकाल ३-४ दिवसांपूर्वीच आलेला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.