नागदेववाडी येथील केंद्रीय शाळेत आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule14 Oct 25 person by visibility 125 categoryसामाजिक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळा विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा झाली. त्यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळाला. हस्तकलेचं कौशल्य दाखवत विद्यार्थ्यांनी एकाहून एक सुंदर आकाश कंदील बनवले.
भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन यांच्या वतीने, करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळा विद्या मंदिरमध्ये आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा झाली. मुलांच्या कला कौशल्याला गती देवूया. चला प्लॅस्टिकमुक्त भारत घडवूया... हे ब्रीद वाक्य घेवून कार्यशाळा झाली. यावेळी भागीरथीच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, रोटरीचे सचिव विकास राऊत, रोटरीचे सचिन लाड, माजी सरपंच विश्वास निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि युवतींसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे मुलांच्या कल्पक वृत्तीला वाव देण्यासाठी आकाश कंदील निर्मितीची कार्यशाळा घेण्यात येत आहे. त्यामध्ये सहभागी झाल्याचे आवाहन सौ. अरूंधती महाडिक यांनी केले. तसेच आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेतून मुलांना हस्तकलेबाबत आवड निर्माण होवून, त्यांच्यामध्ये विचार करण्याची वृत्ती, निरीक्षण शक्ती आणि कल्पकता वाढीस लागेल, असा विश्वास सौ महाडिक यांनी व्यक्त केला. तर रोटरीचे सचिव विकास राऊत आणि माजी सरपंच विश्वास निगडे यांनी या उपक्रमामुळे शालेय मुलांमध्ये विविध कौशल्यांचा विकास होईल. त्यादृष्टीने रोटरी आणि भागीरथीचा उपक्रम फलदायी असल्याचे सांगितले. प्रशिक्षक सुहास प्रभावळे यांनी विद्यार्थ्यांकडून आकाश कंदील बनवून घेतले.
यावेळी शाळा व्यवस्थापन अमृत दिवसे, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया कामिरे, कल्पना निगवेकर, अनिल गायकवाड, अरूण प्रभावळे, भिमराव भडणकर, मुख्याध्यापक दिलीप जाधव, ज्योती गवळी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.