SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्राचे वैभव गड किल्ले प्रतिकृती 'दुर्गोत्सव' उपक्रम - विश्वविक्रमाच्या दिशेने एक पाऊलकोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील पॅचवर्कची व सिलकोटची कामे सुरुगोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे : आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकरमाणूसपणाला आवाहन करणाऱ्या कथा लिहा : आसाराम लोमटे यांचे आवाहननागदेववाडी येथील केंद्रीय शाळेत आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादचोरीच्या 15 मोटर सायकलींसह एकूण 10,25,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; सराईत मोटर सायकल चोरटयास अटक...श्रुती कुलकर्णी यांचे निधनपालकांनी मुलांना समजून घेतले तरच ताण- तणाव कमी होतील कोल्हापुरात बाजारात वडाप घुसल्याने भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमी

जाहिरात

 

माणूसपणाला आवाहन करणाऱ्या कथा लिहा : आसाराम लोमटे यांचे आवाहन

schedule14 Oct 25 person by visibility 50 categoryशैक्षणिक

▪️शिवाजी विद्यापीठात नवलेखक कथालेखन कार्यशाळेला उत्साही प्रतिसाद

कोल्हापूर : शोषण आणि विषमता याविरुद्ध हुंकार भरणाऱ्या, माणूसपणाला आवाहन करणाऱ्या अनुभवसिद्ध कथा नवलेखकांनी लिहाव्यात, असे आवाहन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक आसाराम लोमटे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने एकदिवसीय नवलेखक कथालेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. उद्घाटक म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार किरण गुरव उपस्थित होते, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेला नवलेखकांसह साहित्य रसिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला.

लोमटे यांनी अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागूल, व्यंकटेश माडगूळकर, मुन्शी प्रेमचंद इत्यादी कथाकारांचे दाखले देत उपस्थितांना कथालेखनाचे विविध पदर उलगडून सांगितले. ते म्हणाले, कथालेखनाची एकच एक अशी ‘रेसिपी’ नसते, तसेच ती सरधोपटपणे सांगावयाची गोष्ट नसते. प्रत्येक व्यक्तीचे आपापले स्वतंत्र विश्व असते, स्वतंत्र शैली आणि कल्पना असते. त्यामुळे जे अंतःकरणातून येते, जे अस्वस्थ करते, आपल्या माणूसपणाला आवाहन करीत आतून हलवून टाकते आणि आपल्या जगण्याला पार बदलवून टाकते, अशा गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. तुम्ही काय सांगू पाहता आणि तुम्ही ते कशा भाषेत मांडू पाहता, या दृष्टीने आशय आणि अभिव्यक्तीचे महत्त्व मोठे असते. आपल्या वाट्याला आलेल्या काळाच्या तुकड्यांचे वस्तुनिष्ठ अनुभवकथन जितके श्रेष्ठ, तितकेच चिमूटभर वास्तवाला आभाळभर कल्पिताची जोड देऊन व्यापक समुदायाच्या अनुभवाशी एकजीव करणारी कथाही महत्त्वाची असते. कथेच्या प्रवासात एका क्षणी तिचे पुस्तकी होणे चिंतेचे असले तरी नव्या वाटा शोधत नवलेखकांनी नवी कथा घडविली पाहिजे. लोककथांना वर्तमानाचे आयाम देऊन त्या सादर केल्या पाहिजेत. आज आपण कोणत्याही अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीने विचलित होत नाही, हे आजच्या काळाचे विदारक वास्तव आहे. आजच्या कालखंडात गोष्ट सांगण्यातला, ऐकण्यातला निवांतपणा हरपला असला तरी कथन परंपरा टिकविण्यासाठी या परंपरेचे पूर्वसंचित आपणाला नव्याने सामोरे आणावे लागेल. त्या दृष्टीने नवलेखकांकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटनपर मनोगतात डॉ. किरण गुरव यांनी कथाप्रकाराला गौणत्व देण्याच्या मानसिकतेवर बोट ठेवले. ते म्हणाले, भाऊ पाध्ये, भास्कर चंदनशिव, व्यंकटेश माडगूळकरांपासून जयंत पवारांपर्यंत अशा कित्येक दिग्गजांनी जो साहित्यप्रकार आपल्या लेखनाने, शैलीने समृद्ध केला आणि ज्याद्वारे जीवनाची समग्रता व्यक्त होते, असा हा प्रकार गौण असूच शकत नाही. भावना, कल्पना, बुद्धीचातुर्य आणि वास्तव यांचा मेळ घालून कथाकार आपली गोष्ट संपन्न करीत असतो. हे नवलेखकांनी समजून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, ज्या लेखनात प्रवाहीपण, कालातीत संदर्भ आणि वाचकाला जोडण्याचे सामर्थ्य असते, ते मनाला भिडते. वास्तवदर्शन घडविणाऱ्या कथा सर्वस्पर्शी ठरतात. लोकांच्या जगण्याचे प्रतिबिंब असलेल्या कथांनाच लोकमान्यता मिळते. हे विद्यार्थ्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

यावेळी मराठी अधिविभागातील सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. सुरवातीला डॉ. गुरव यांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यशाळेस डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. अण्णासाहेब मोहोळकर, जयसिंग पाटील यांच्यासह संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

दरम्यान, दिवसभरात विविध सत्रांमध्ये मान्यवरांनी नवलेखकांना मार्गदर्शन केले. ‘कथानिर्मिती व अनुभव’ या सत्रात प्रसाद कुमठेकर (मुंबई), विवेक कुडू (पालघर) यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नंदकुमार मोरे सत्राध्यक्ष होते. ‘कथानिर्मिती: आकार आणि अनुभव’ या सत्रात सुचिता घोरपडे (पुणे) आणि फारुक काझी (सांगोला) यांनी मार्गदर्शन केले. नीला जोशी सत्राध्यक्ष होत्या. कवी प्रवीण बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes