तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे : आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर
schedule14 Oct 25 person by visibility 56 categoryराज्य

कोल्हापूर : तरुणाई ही राष्ट्राची ताकद असून, त्यांचे आरोग्य सशक्त असणे गरजेचे आहे. मात्र आजच्या काळात अंमली पदार्थांचे सेवन, तंबाखू, गुटखा, धूम्रपान यामुळे तरुण पिढी आरोग्याच्या गंभीर संकटात सापडले आहेत. व्यसन ही कोणत्याही समस्येचे उत्तर नाही. तरुणांनी रात्रीच्या वाईट सवयी असणारे मित्र न ठेवता पहाटे लवकर उठून व्यायाम करणारे, आरोग्यदायी जीवन जगणारे मित्र जोडावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या तंबाखूमुक्त युवा अभियान 3.0 या 60 दिवस चालणाऱ्या अभियानाचा शुभारंभ नुकताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम-
सीपीआरएच कोल्हापूर कक्ष यांच्या वतीने जिल्हास्तरीय अभियानाचा प्रारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते युवा रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
आबिटकर म्हणाले, तरुणांनी मैदानी खेळ, योग, ध्यानधारणा व सकस आहाराचा अंगीकार करावा. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांची संगत योग्य आहे का याकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या राज्यातील अधिकाधिक शाळा व गावे तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.”
कार्यक्रमात जिल्हा नोडल अधिकारी डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी प्रास्ताविक करत तंबाखू नियंत्रण कक्षाच्या उपक्रमांचा आढावा मांडला. त्यांनी कोटपा कायदा 2003, तंबाखू मुक्त शाळा व गाव या संकल्पना स्पष्ट केल्या आणि उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. दंतशल्य चिकित्सक डॉ. वृषाली खोत यांनी मौखिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करत तंबाखू सेवनाचे दातांवरील परिणाम सांगितले.
या अभियानात उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनीही तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तरळकर, डॉ. अमोल पाटील, डॉ. आनंद वर्धन, डॉ. राजेंद्र शेटे तसेच युवक-युवती, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.