कुपोषित बालकांना जिल्हा परिषद सदस्य घेणार दत्तक
schedule31 Aug 26 person by visibility 64 categoryराज्य
◼️अंगणवाड्यांमधील सुविधा सक्षम करण्याचे सभापती विद्या पाटील यांचे निर्देश
कोल्हापूर : जिल्हा परिषद कोल्हापूर येथील स्व. वसंतराव नाईक समिती सभागृहात महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती विद्या विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण व अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून, जिल्हा परिषद सदस्य आपापल्या मतदारसंघातील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
सभेच्या सुरुवातीला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागीय पुरस्कार’ पात्र ठरलेल्या ‘स्वयंप्रेरिका ग्रामीण महिला संस्था’ (पोर्ले तर्फे बोरगाव) आणि ‘भगवानबाबा शिक्षण प्रसारक संस्था’ (इचलकरंजी) या संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सभापती विद्या पाटील यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ज्या अंगणवाड्यांमध्ये सोलर पॅनेल नादुरुस्त आहेत, तेथे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तात्काळ वीज जोडणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, बालकांच्या आरोग्याच्या अचूक नोंदीसाठी नादुरुस्त वजनकाटे बदलून नवीन काटे देणे आणि बंद असलेले डिजिटल लर्निंग टीव्ही बदलून नवीन टीव्ही उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच करवीर पंचायत समिती येथे महिलांसाठी नवीन समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे शिफारस करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
बैठकीदरम्यान सदस्या वर्षाराणी पाटील यांनी उपस्थितांना ‘नशामुक्तीची शपथ’ दिली. सभेचे आभार सदस्या सोनाली पाटील यांनी मानले.
यावेळी समिती सदस्या वर्षाराणी पाटील, शैलजा पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे, सोनाली पाटील, विनिता भोगम, गडहिंग्लज पंचायत समिती सभापती प्रतिभा चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के, कक्ष अधिकारी संजय जाधव, अधीक्षक नारायण चांदेकर, विस्तार अधिकारी प्रशांत पाटील, सौरभ कांबळे तसेच जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) उपस्थित होते.