तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक: डॉ. श्रीरंग गायकवाड
schedule19 Mar 25 person by visibility 191 categoryसामाजिक

कोल्हापूर : तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने तुकाराम बीजेनिमित्त आयोजित ‘संत तुकोबांचे चौदा टाळकरी’ या विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. येथील शाहू स्मारक भवनात (दि. १७) झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. गायकवाड म्हणाले की, संत तुकारामांच्या अभंगाचे संकलन करण्याचे मोलाचे काम तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांनी केले. तुकोबांच्या सोबत असणारे चौदा टाळकरी समाजातील सर्व स्तरांतील होते. बहुजन समाजामध्ये जागृती करण्याचे काम त्यांनी केले. या चौदा टाळकऱ्यांच्या जीवनचरित्राचा आणि कार्याचा सविस्तर आढावा गायकवाड यांनी घेतला.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, तुकारामाच्या चौदा टाळकऱ्यांचे कार्य समाजासमोर एक आदर्श आहे. निष्ठेचे मूर्तीमंत प्रतीक आहेत.
संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी तुकाराम शिर्के, डॉ. डी. ए. देसाई, डॉ. अनिल गवळी, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. संजय पाटील, मराठी विभागाचे संशोधक व एम.ए.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.