शिवाजी विद्यापीठात अजित पवार यांना श्रद्धांजली
schedule29 Jan 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे एक कुशल, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जाण असणारे, तडफदार आणि उमदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठात आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज राजर्षी शाहू सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले. अजित पवार यांना शिवाजी विद्यापीठाप्रती आस्था होती. त्यामुळेच त्यांनी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव सुवर्णमहोत्सव निधीची तरतूद केली. त्यामधून विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी, बाळासाहेब देसाई अध्यासन, राजर्षी शाहू म्युझियम कॉम्प्लेक्स इत्यादी उपक्रमांची उभारणी करता येऊ शकली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. गोविंद कोळेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, सागर लांडे, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. शोकसभेला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.