महाराष्ट्राची तनु भान देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट'; प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित
schedule29 Jan 26 person by visibility 104 categoryराज्य
नवी दिल्ली :प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंगमधून (सीनियर विंग) देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट' हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात तनु भान हिला सुवर्ण पदक आणि मानाची 'केन' देऊन गौरविण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनसीसीचे महासंचालक लेफ्टिनेंट जनरल वीरेंद्र वत्स यांची विशेष उपस्थिती होती.
देशभरातील १७ संचालनालयांमधील २० लाख कॅडेट्सच्या स्पर्धेत, तनुने आपल्या अद्वितीय शिस्तीच्या आणि अष्टपैलू कौशल्याच्या जोरावर हे ऐतिहासिक यश खेचून आणले. 'राष्ट्र प्रथम - कर्तव्यनिष्ठ युवा' या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, तिने प्रशिक्षणातील सर्व कठीण टप्पे यशस्वीपणे पार करत देशात प्रथम क्रमांक पटकावला.
या प्रसंगी कॅडेट्सना संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या राष्ट्रभक्तीचा गौरव केला. प्रधानमंत्री म्हणाले की, समोर असलेले हे तरुण केवळ गणवेशातील कॅडेट्स नसून, ते 'विकसित भारत'चे निर्माते आहेत. तुमचे परिश्रम, त्याग आणि अनुशासन हेच देशाला प्रगतीपथावर नेणारे मुख्य आधारस्तंभ आहेत. 'राष्ट्र प्रथम - कर्तव्यनिष्ठ युवा' या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी तनु भान आणि इतर विजेत्यांचे विशेष कौतुक केले. ही वचनबद्धता देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.