‘आत्मनिर्भर’ भारताचे स्वप्न संरक्षण दलामध्ये सत्यात उतरत आहे : सब.लेफ्ट. ईशा शहा
schedule29 Jan 26 person by visibility 117 categoryसामाजिक
🟠 केआयटी मधील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण नौसेनेत ऑफिसर असणाऱ्या माजी विद्यार्थिनी च्या हस्ते
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयामध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून भारतीय नौसेनेतील अधिकारी व केआयटीच्या माजी विद्यार्थिनी सब.लेफ्ट. ईशा शहा उपस्थित होत्या.
सब.लेफ्ट. ईशा शहा यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या दिवसाचे महत्त्व या दिवशी नेमके काय झाले याबाबत त्यांनी थोडक्यात माहिती दिली.भारतीय संरक्षण दल आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होत असताना आत्मनिर्भर भारताचे स्वप्न संरक्षण दलामध्ये प्रत्यक्षात येत आहे असा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
स्वयंशिस्त व सर्वोत्तम काम ही आपली सवय झाली तरच आपण यशस्वी होऊ शकतो असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. संरक्षण दलामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्याचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले.
या प्रसंगी संस्थेच्या वतीने प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील २८ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या शाहू माने, विश्व तांबे, सानिया सापळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये (NDA) निवड झालेल्या प्रथम वर्षातील अनुप पाटील,सिद्धराज भोसले विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसह करण्यात आला.
केआयटी एन.सी.सी युनिटच्या विद्यार्थ्यांनी युद्धाचे प्रात्यक्षिक सादर केले. एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी ‘रील्स व रिअल’ या विषयावरील समाज प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली,उपाध्यक्ष सचिन मेनन, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ.दत्तात्रय जे.साठे तसेच केआयटी अभियांत्रिकी व व्यवस्थापन (आय.एम.ई.आर.) महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एन.सी.सी.च्या स्वरदा नाईक यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला तर संजना गजरे यांनी एन.सी.सी.युनिट ची माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तृप्ती गुणे यांनी केले.