शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्सचा वापर गरजेचा : विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांचे प्रतिपादन
schedule29 Jan 26 person by visibility 170 categoryशैक्षणिक
🟠 डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘टेकस्प्रिंट : डायमेन्शन एक्स’ हॅकेथॉन संपन्न
कोल्हापूर : शेती क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी शेतीला अभियांत्रिकी आणि अद्ययावत एआय तंत्रज्ञानाची जोड देणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास मध्यस्थांची साखळी मोडीत निघेल आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात मोठी वाढ होईल, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक आणि ‘रामेती’चे प्राचार्य बसवराज भीमप्पा मास्तोळी यांनी केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘टेकस्प्रिंट : डायमेन्शन एक्स’ या राष्ट्रीय स्तरावरील २४ तासांचा हॅकेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात मास्तोळी बोलत होते. गुगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस – डीवायपीसीईटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत लीड कॉलेज उपक्रमांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागप्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कौशल्ये, नवोन्मेष आणि स्टार्टअप विचारसरणी विकसित करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
१६ व १७ जानेवारी रोजी झालेले ‘टेकस्प्रिंट : डायमेन्शन एक्स’ हे गुगलच्या ओपन इनोव्हेशन संकल्पनेवर आधारित बहिस्तरीय हॅकेथॉन असून, देशभरातून ९०० पेक्षा अधिक नोंदणी झाली होती. त्यामधून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या ४० संघांनी सलग २४ तास प्रकल्प विकास व सादरीकरण केले. अंतिम फेरीत महाराष्ट्र, तामिळनाडू व कर्नाटक आदी विविध राज्यांतील संघांचा सहभाग होता.
अंतिम फेरीदरम्यान तज्ज्ञ परीक्षक दिनेश कुडाचे (टेक्नोवेल वेब सोल्युशन्स, पुणे) व प्रा.नामदेव सावंत (सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर) यांनी सहभागी संघांच्या प्रकल्पांचे सखोल व तांत्रिक मूल्यांकन केले. संकल्पनेची नव्यता, तांत्रिक अंमलबजावणी, व्यावहारिक उपयोगिता व सादरीकरण कौशल्य या विविध निकषांवर संघांचे परीक्षण करण्यात आले.
या हॅकेथॉनमध्ये आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूरच्या तनिशा बडगुजर, ओजस्विनी बोरसे, सिद्धेश चौधरी व अथर्व भाश्मे यांच्या ‘प्रीटी डेंजरस’ संघाने प्रथम क्रमांक मिळवला. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूच्या प्रतिक गायकवाड व सोहम देशपांडे यांच्या ‘स्किन स्क्रिपर्स’ संघाने द्वितीय क्रमांक तर तामिळनाडूच्या श्री ईश्वर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोईबतूरच्या जयनारायण मेनन नेट्टथ व जेयनंदन ए यांच्या ‘नोवाकोर’ संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजयी संघांना अनुक्रमे, 15 हजार, 10 हजार व 5 हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. हॅकाथॉनचे नेतृत्व गुगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस – डीवायपीसीईटीचे लीड आयुष वसवाडे व कोर टीमने केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, श्री. पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.