पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिये फाटा येथील अपघातात दोघांचा मृत्यू
schedule25 Aug 24 person by visibility 984 categoryगुन्हे
कोल्हापूर : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाटा येथे महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात पादचाराचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सचिन चौगुले (वय 40, रा. शिरोली) सौरभ साळोखे (वय 30, रा. हरीपूजा नगर कोल्हापूर) अशी दोघांची नावे आहेत.
शिरोली एमआयडीसी मधील एका कारखान्यातील काम संपल्यानंतर सचिन उर्फ पोपट चौगुले हा कामगार शिये फाटा येथे महामार्ग ओलांडून दुर्गामाता हॉटेलच्या दिशेने चालला होता. याचवेळी सादळे मादळे दिशेने सौरभ संजय साळोखे हा युवक दुचाकीवरून वेगाने जात होता. यावेळी महामार्ग ओलांडणाऱ्या सचिन चौगुले यास मोटरसायकलची जोरदार धडक बसली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सचिन जागीच ठार झाला.
दुचाकी स्वार साळोखे हा गंभीर जखमी झाला त्याला सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले असता त्याचाही मृत्यू झाला. शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये याा अपघाताची नोंद झाली आहे.