संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम
schedule24 Jan 26 person by visibility 56 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांडेकर, सहाय्यक निरीक्षक अजिंक्य डुबल, सहाय्यक निरीक्षक अनुसया माळी, निरीक्षक. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, विद्यार्थी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अत्यंत उदाहरणासह अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्याने केवळ शासकीय दंड टळत नाही, तर स्वतःच्या व इतरांच्या अमूल्य प्राणांचेही संरक्षण होते.” विद्यार्थ्यांकडे देशाच्या भवितव्याची धुरा असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी वाहतूक नियम काटेकोरपणे पाळले, तर अपघातांचे प्रमाण निश्चितच घटेल. सुरक्षित वाहतूक संस्कृतीमुळे देश, राज्य आणि गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल.” रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून, ती सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलतेची जाणीव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन रुजू झालेले सहाय्यक निरीक्षक अजिंक्य डुबल यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरील नियमावली, वाहन चालवताना पाळावयाची शिस्त, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, वेगमर्यादा, सिग्नलचे पालन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे नियम समजावून सांगत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले.
या मार्गदर्शन कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.