कोल्हापूर महापालिका वर्कशॉपमधील स्क्रॅपचा तातडीने लिलाव करा; सभापती विशाल शिराळे यांचे अधिकार्यांना कडक निर्देश
schedule25 May 26 person by visibility 187 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्कशॉप विभागातील ढिसाळ कारभारावर आणि पडून राहिलेल्या साहित्यावर स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज सायंकाळी पाहणी केली. वर्कशॉपमधील अस्ताव्यस्त पडलेला जुना स्क्रॅप (भंगार) पाहून सभापतींनी तीव्र संताप व्यक्त केला आणि हा सर्व स्क्रॅप तातडीने बाहेर काढून त्याचा त्वरित लिलाव करण्याचे कडक आदेश संबंधित अधिकार्यांना दिले. या धडक मोहिमेवेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, अभय तेंडुलकर, राजू पागर, महेश महाडीक आणि सुधीर राणे आदी अधिकारी उपस्थित होते.
सभापती विशाल शिराळे यांनी केवळ औपचारिकता न करता वर्कशॉपची संपूर्ण आणि सखोल पाहणी केली. त्यांनी विविध विभागातील कामकाजाचा खरपूस आढावा घेत, कामात चालढकल खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम भरला. वर्कशॉपच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी आणि अधिकार्यांची टोलवाटोलवी जाणून घेत त्यांनी जागेवरच कडक निर्देश दिले. शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सुटल्या पाहिजेत, यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला स्वतंत्र टँकर, जेसीबी, डंपर आणि रोलर उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले. या निर्णयामुळे प्रभागातील रखडलेल्या विकासकामांना आता कमालीची गती मिळणार आहे.
या पाहणी दरम्यान १५ वर्षांची कायदेशीर मुदत पूर्ण करून धूळ खात पडलेल्या तब्बल २७ वाहनांचा प्रश्न समोर आला. यावर सभापतींनी आक्रमक पवित्रा घेत, या सर्व वाहनांचा शासनाच्या अधिकृत कंपनीमार्फत तात्काळ लिलाव सूचना केली केवळ वर्कशॉपच नव्हे, तर महापालिकेच्या सर्वच विभागांमधील स्क्रॅप काढण्याचे चोख नियोजन करा, असे निर्देश दिले. या लिलाव प्रक्रियेतून महापालिकेच्या तिजोरीत मिळणाऱ्या उत्पन्नातून तातडीने नवीन वाहने आणि वर्कशॉपला आवश्यक असणारे दर्जेदार साहित्य खरेदी करण्यात यावे, जेणेकरून महापालिकेचे आर्थिक नुकसान टळेल आणि कामाचा दर्जा सुधारेल, असे खडे बोल सभापती विशाल शिराळे यांनी अधिकार्यांना सुनावले.