यड्राव बँकेला जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदान
schedule01 Oct 26 person by visibility 125 categoryउद्योग
जयसिंगपूर : आर्थिक सक्षमता, विविध आर्थिक निकषांची पूर्तता, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन, ग्राहकांना दर्जेदार सेवा, सातत्यपूर्ण नफा आणि व्यवसायवाढ या विविध निकषांवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यड्राव को-ऑप. बँक लि., यड्राव या बँकेला आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्याकडून ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप परितोषिक व प्रमाणपत्र असे आहे. बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर, उपाध्यक्ष दिलीप मगदुम, संचालक विशाल आवटी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे व विकास अधिकारी प्रवीण म्हैसाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे तसेच संचालक मंडळाच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी सर्वोत्कृष्ट बँक निवडीसाठी असलेल्या विविध निकषांचे विश्लेषण केले.
यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले की, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. बँकेने सुरुवातीपासूनच ग्राहक सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. बदलत्या बँकिंग व्यवस्थेचा स्वीकार करताना ग्राहकांच्या सोयीसाठी अद्ययावत डिजिटल व मोबाइल बँकिंग सेवा तसेच एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बँकेच्या चार जिल्ह्यांतील कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण ठेवी व कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. तसेच राज्य व केंद्र सरकारच्या सबसिडी आणि व्याजपरतावा आधारित कर्ज योजनांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात बँकेने पुढाकार घेतला आहे.
बँकेची आर्थिक सक्षमता आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक व नियामक निकषांचे काटेकोर पालन यामुळे सामान्य ग्राहकांचा बँकेवरील विश्वास वाढला आहे. या कामाची जिल्हास्तरावर झालेली दखल ही बँकेसाठी अभिमानाची बाब असल्याचे यड्रावकर यांनी नमूद केले.
बँकेचा वाढता व्यवसाय आणि विस्तारत असलेले कार्यक्षेत्र लक्षात घेता, बँक लवकरच ५०० कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार करून कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास अजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांनी यड्राव को-ऑप. बँकेचे अभिनंदन केले. यावेळी असोसिएशनचे सभासद, विविध सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.