कोल्हापूर जिल्ह्यातील नगर पालिका निवडणूक लढती स्पष्ट; उमेदवार लागले प्रचाराला..
schedule22 Nov 25 person by visibility 75 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिका व नगरपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या माघारी नंतर प्रभाग निहाय लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती पाहावयास मिळत आहेत. आज पासून प्रचाराचे नारळ फुटतील आणि नेते मंडळींचे दावे, प्रति दावे, आरोप प्रत्यारोप अनुभवयास मिळेल . दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
🔸कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चार व एका अपक्ष अशी पंचरंगी लढत होत आहे. कागल मध्ये आठ ठिकाणी दुरंगी लढत पाहावयास मिळत आहे. तर नगरसेवक पदासाठी 22 जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामुळे प्रभागात दुरंगी, तिरंगी काही ठिकाणचा चौरंगी लढत पाहावयास मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी सविता माने (राष्ट्रवादी-शाहू आघाडी), सुगंधरा घाटगे (शिंदेसेना), गायत्री प्रभावळकर (काँग्रेस), शारदा नागराळे (उध्दवसेना), राष्णी सोनुले (अपक्ष) रिंगणात आहेत. मंत्री हसन मुश्रीफ व समरजीत घाटगे एकत्र आल्याने जिल्ह्याचे लक्ष कागल नगर परिषदेकडे लागले आहे.
🔸मुरगूड नगर परिषदेसाठी निवडणूक होत असून नगर परिषदेच्या 20 जागेसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी अशी लढत पहावयास मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या पत्नी तस्नीम राजेखान जमादार (राष्ट्रवादी-शाहू आघाडी), माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनीदेवी पाटील (शिंदेसेना आणि भाजप) यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे.
🔸कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होत आहे. तर वीस जागांसाठी पाच पक्षासह 61 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होत असून यामध्ये मनीषा डांगे (शाहू आघाडी), योगिनी पाटील (काँग्रेस), समीरा जोशी (भाजप), परवीन पठाण (अपक्ष) या निवडणूक रिंगणात आहेत.
🔸शिरोळ नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होत असून नगरसेवक पदासाठी तिरंगी लढतीचे चित्र पहावयास मिळत आहे. माघारीनंतर शिवशाही आघाडी, ताराराणी आघाडी तसेच शाहू विकास आघाडी अशी तिरंगी लढत पाहावयास मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी योगिता कांबळे (शिवशाहू ), श्वेता काळे (शाहू आघाडी), सारिका सारिका माने (ताराराणी), करुणा कांबळे (अपक्ष) आपले भवितव्य आजमावत आहेत.
🔸हातकणंगले नगरपंचायतीसाठी सर्वच पक्ष स्वभावावर लढत असून नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणाआहेत. तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 78 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामुळे नगराध्यक्ष पदाबरोबरच नगरसेवकांसाठी ही बहुरंगी लढतीचे चित्र पाहावयास मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी राजू इंगवले (भाजप), अजितसिंह पाटील (शिदेसेना), दीपक वाडकर (काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट), अभिषेक पाटील (उध्दव सेना), दीपक कुन्नूरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) निवडणूक रिंगणात आहेत.
🔸गडहिंग्लज नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध महायुती यांच्यात दुरंगी सामना होत असून महायुतीमध्ये जनता दल, जनसुराज्य, भाजपा, शिंदे सेना, काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. मनसेच्या महिला उमेदवार राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदाच्या बावीस जागांसाठी 52 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी महेश तुरबतमठ (राष्ट्रवादी), गंगाधर हिरेमठ (महायुती), प्रकाश कांबळे (वंचित), विनोद बिलावर, वीरसिंग बिलावर व सचिन साबळे (उपक्ष)
🔸पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये प्रतीक्षा वराळे, प्रियंका गवळी, सतीश भोसले, रामानंद पर्वतगोसावी, सखाराम काशीद, असिफ मोकाशी बिनविरोध निवडून आले आहेत. नगरसेवक पदासाठी काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी सामना पहावयास मिळत आहे. तर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी दुरंगी लढत होत असून यामध्ये जयश्री पोवार (जनसुराज्य), सुधा भगवान (अपक्ष) यांच्या लढत होत आहे
🔸जयसिंगपूर नगरपरिषदेसाठी निवडणूक होत असून नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी खरा सामना हा शाहू आघाडीचे संजय पाटील यड्रावकर व शिरोळ तालुका विकास आघाडी जनसंघर्ष आघाडीचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्यात दिसून येत आहे. नगरसेवक पदाच्या 26 जागांसाठी 83 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी
संजय पाटील यड्रावकर (शाहू आघाडी), सुदर्शन कदम (शिरोळ विकास, जनसंघर्ष), सुलतान शेख, परशुराम माने, मुबीन मुल्ला (तिन्हीं अपक्ष) निवडणूक रिंगणात आहेत.
🔸हुपरी नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत होत आहे. नगरसेवक सेवक पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 92 उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे दुरंगी तिरंगी सामन्याचे चित्र पहावयास मिळत आहे या निवडणुकीमध्ये उद्धव सेनेना 16, राष्ट्रवादीने नऊ, काँग्रेसने सहा, तर सदगुरु संत बाळूमामा आघाडी पाच जागा लढवत आहे. हुपरी नगराध्यक्ष पदासाठी मंगलराव माळगे (भाजप), अण्णासाहेब मधाळे (राष्ट्रवादी), मीना जाधव उद्धव सेना), सुनील धोंगडे (अंबाबाई आघाडी), रमेश भोरे (हिंदू महासंघ, श्रीमंत शिराळे (अपक्ष)
🔸वडगाव नगर परिषदेसाठी निवडणूक होत असून नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होताना दिसत आहे. नगरसेवकांसाठी दुरंगी काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी प्रविता सालपे (जनसुराज्य-ताराराणी आघाडी, विद्याताई पोळ (यादव आघाडी), प्रल्हाद तालुगडे (अपक्ष) उमेदवार रिंगणात आहेत.
🔸चंदगड नगरपंचायत निवडणूक साठी नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत असून नगरसेवकाच्या 17 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत नगराध्यक्ष पदासाठी दयानंद काणेकर (शाहू आघाडी), सुनील काणेकर (भाजप), श्रीकांत कांबळे (बसपा) यांच्यात लढत होत आहे.
🔸मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनसुराज्य भाजप व राष्ट्रीय दलित महासंघ विरुद्ध उद्धव सेना, राष्ट्रवादी व शेकाप यांच्यात लढत होत आहे. नगरसेवक पदाच्या 19 जागांसाठी 55 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी रश्मी कोठावळे (जनसुराज्य), माया पाटील (उध्दवसेना), दया प्रभावळकर (अपक्ष) लढत होत आहे. तर प्रभाग पाच मधून जनसुराज्य पक्षाचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर बिनविरोध निवडून आले आहेत.
🔸आजरा नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची लढत बहुरंगी होत आहे. तर नगरसेवक पदासाठी तिरंगी लढत होत आहे नगराध्यक्ष पदासाठी सहा तर 17 नगरसेवक जागेसाठी 58 राहिले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी मंजूर मुजावर, बाकायू खेडेकर, नियामत मुजावर (सर्व अपक्ष) निवडणूक लढवत आहेत.