सेवाभावी संस्थांची सामाजिक बांधिलकी
schedule21 Oct 25 person by visibility 118 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोरगरीब व पिडीत नागरिकांना, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र या दोन्ही सेवाभावी संस्थांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत, दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
या दोन्ही संस्था सातत्याने समाजाप्रती कृतज्ञता जोपासत समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी अविरतपणे कार्य करीत आहेत.
दिवाळी सणानिमित्त सर्वजण एकमेकांना, ही दिवाळी सुख-समृद्धीची, आरोग्यदायी व भरभराटीची जावो अशा शुभेच्छा देत असतात. मात्र कांही मानवी चुका तसेच सध्याच्या एकत्रित कुटुंबीय पद्धतीचा अभाव यामुळे थोरामोठ्यांना उतारवयात आधार देणे दुरापास्त होत चालले आहे. त्यामुळे संबंधित नागरिक आपल्या कुटुंबीयांना ओझे झाले आहेत कि काय ? असा प्रश्न पडतो. इतरांप्रमाणेच त्यांनादेखील या वयात आपल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करता येईल का ? नवीन कपडे, दिवाळी फराळ मिळेल की नाही ? याची शाश्वती नसते.
ज्या कुटुंबियांसाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, त्यांच्याच प्रेमाला या वयात पारखे व्हायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक आठवणींना उजाळा देत, आज हे सर्वजण नैराश्याचे जीवन जगत असताना दिसत आहेत.
अशा विविध कारणांमुळे दिवाळी सणाचे औचित्य साधून - राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र या दोन्ही सेवाभावी संस्थांच्यावतीने वटेश्वर मंदिर, मारुती मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, दत्त भिक्षालिंग मंदिर, रावणेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिर आदी. परिसरातील स्वतःच्या कुटुंबियांच्या प्रेमाला पारखे झालेल्या, गोर-गरीब व पिडीत नागरिकांना दिवाळी फराळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी सुरेश केसरकर, सुभाष पाटील, संजय सासने, भगवान माने, संभाजी थोरात, अनिता काळे, शिवाजी चौगुले, राजेंद्र निकम, विजय आरेकर, बाळासाहेब कांबळे, रघुनाथ मुधाळे, सुजय देसाई, संजय गुरव, अविनाश पोवार, दिनकर आडसुळ आदी. सहकारी उपस्थित होते..