विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास मनाई
schedule11 Dec 25 person by visibility 57 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असुन राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशान्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे.
यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 21 डिसेंबर रोजी विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्ते / कोणत्याही व्यक्ती राजकीय पक्ष/संस्था यांनी गावातून / शहरातून मिरवणूक /रॅली काढणे. सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे. फटाके लावणे/फोडणे, या कृती करण्यास मनाई केली आहे.
हा आदेश 21 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी लागू राहिल. हा आदेश तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.