न.पा. मतमोजणी 21 डिसेंबरला; जिल्हाधिकाऱ्यांकडून 200 मीटर परिसरात निर्बंध लागू
schedule11 Dec 25 person by visibility 42 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असुन राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशान्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पन्हाळा, मलकापूर, वडगांव, हुपरी, जयसिंगपुर, शिरोळ, कुरुंदवाड, गडहिंग्लज, कागल, मुरगूड या नगरपरिषद व हातकणंगले, आजरा व चंदगड नगरपंचायत मधील मतदार संघासाठी 2 डिसेंबर रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान झाले असून रविवार, 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत मतदारसंघ निहाय मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
▪️नगरपरिषद व नगरपंचायत व मतमोजणीचे ठिकाण -
▪️पन्हाळा - पन्हाळा नगरपरिषद सांस्कृतिक हॉल, मयुर उद्यान
▪️मलकापूर - मलकापूर नगरपरिषद कार्यालय, दुसरा मजला सभागृह
▪️वडगांव - मराठा समाज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज चौक
▪️हुपरी - सभागृह, केंद्रीय प्राथमिक शाळा
▪️हातकणंगले - पहिला मजला सभागृह, तहसिलदार कार्यालय
▪️जयसिंगपूर - सिध्देश्वर यात्री निवास येथील नगरपरिषद कार्यालय
▪️शिरोळ - सभागृह पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
▪️कुरुंदवाड - जिम्नॅशियम हॉल, तबक उद्यान
▪️गडहिंग्लज - पॅव्हेलियन इमारत, गांधीनगर
▪️आजरा (नगरपंचायत)- मुख्य सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत
▪️चंदगड (नगरपंचायत)- चंदगड तहसिलदार कार्यालय
▪️कागल (नगरपंचायत)- सवित्रीबाई फुले मार्केट, जयसिंगराव पार्क
▪️मुरगूड - डॉ. बाबासाहेब आंबडेकर बौध्द विहार
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या मतदार संघनिहाय मतमोजणी ठिकाणच्या परिसरात जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी सकाळी 07.00 वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू केले आहेत.
मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर सभोवतालच्या परीसरात मतमोजणी कर्मचारी पुरवठादार, उमेदवार व त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला प्रवेश करणे. मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करणे. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे अथवा थांबविणे. (निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून)
मतमोजणी ठिकाणाच्या 200 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणे. (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी वगळून) मतमोजणी ठिकाणी उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने (शस्त्र अधिनियम 1959 व नियम 2016 मधील तरतुदी प्रमाणे) कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नी शस्त्रे व दारुगोळा इ. ची वाहतूक, जवळ बाळगणे अथवा वापर करणे. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी कर्मचारी वगळून.)
या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनियतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.