‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
schedule06 Sep 25 person by visibility 158 categoryराज्य

▪️ ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ७१५९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ३ लाख २६ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.
तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या ९,९६० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून ९५ रक्तदान शिबिरांतून एकूण ६,८६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.
महाराष्ट्रातील ३.२६ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला असून, ६,८६२ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
गणेशोत्सवासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळाली. तपासणीदरम्यान आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार असल्याचे श्री. रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख यांनी कळविले आहे.

