आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार; चंद्रकांत पाटील
schedule05 Sep 25 person by visibility 207 categoryराज्य

मुंबई : विद्यापीठ,महाविद्यालय, अभियांत्रिकी, चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यापुढे आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” या नावाने देण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
डॉ. जे. पी. नाईक यांच्या शैक्षणिक कार्याची दखल केंद्र शासनाबरोबरच देश विदेश आणि युनेस्कोने देखील घेतली आहे. त्यांच्या योगदानाबद्दलची कृतज्ञता म्हणून या पुरस्काराला डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची होणारी निवड अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्वक खऱ्या अर्थाने समर्पित भावनेने शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन, अध्यापन करून मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांची व्हावी याकरिता निवड प्रक्रियेच्या अटी, निकष कार्यपद्धतीत सुधारणा करून सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
▪️पुरस्कारार्थी पुरस्कारासाठी अंतिम केंद्रीय छाननी समिती रचना
समिती सदस्य : अध्यक्ष- कुलगुरू, सदस्य- उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, कला संचालनालय सदस्य असतील तर दोन विषय तज्ञ सहसंचालक, उच्च शिक्षण (मुख्यालय) हे सदस्य सचिव असतील.
▪️राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती
समितीचे अध्यक्ष – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उपाध्यक्ष – उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री, सदस्य अपर मुख्य सचिव,राज्यातील दोन मान्यवर शिक्षण तज्ञ,सदस्य-सचिव संचालक, उच्च शिक्षण हे असणार आहेत.
▪️कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथे ५ सप्टेंबर १९०७ रोजी जन्मलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक हे भारतीय शिक्षण क्षेत्राचे दीपस्तंभ मानले जातात. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देश-विदेशात पोहोचले असून युनेस्कोनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. शिक्षण क्षेत्राला जीवन समर्पित करणाऱ्या या महान विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” या नावाने दिला जाणार आहे. या निर्णयातून शिक्षकांचा सन्मान अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.