कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक -२०२४ यासाठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रविवार, दि.७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप अंतर्गत “ RUN FOR VOTE ” या लोकशाही दौडचे आयोजन करणेत आले आहे. रविवारी सकाळी ५.३० वाजलेपासून पोलिस ग्राऊंड, कसबा बावडा येथे धावपटू जमण्यास सुरुवात होणार असून सकाळी ६.०० पासून लोकशाही दौड, सुदृढ आरोग्याबाबतची जागृती व मतदान प्रक्रिया नि:पक्षपाती, भयमुक्त वातावरणामध्ये दिनांक ०७ मे रोजी जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी दृष्टिने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौड सुरु करण्यात येणार आहे.
लोकशाही दौडची सुरुवात पोलिस परेड ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथून होणार असून त्याचठिकाणी वेगवेगळ्या टप्पयाची दौड संपणार आहे. ३ कि.मी.च्या टप्प्यासाठी पोलिस ग्राऊंड, धैर्यप्रसाद हॉल चौक व आदित्य कॉर्नर पर्यंत असून तिथून धावपटू परत फिरणार आहेत. ५ कि.मी.च्या टप्प्यासाठी पोलिस ग्राऊंड, धैर्यप्रसाद हॉल चौक, आदित्य कॉर्नर व जिल्हाधिकारी कार्यालय चौका पर्यंत असून तिथून धावपटू परत फिरणार आहेत. १० कि.मी.च्या टप्प्यासाठी पोलिस ग्राऊंड, धैर्यप्रसाद हॉल चौक, आदित्य कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, सी.पी.आर.हॉस्पीटल चौक, भवानी मंडप व बिंदु चौकपर्यंत असून तिथून धावपटू परत फिरणार आहेत. दौडमध्ये सहभागी होण्यासाठी आयोजकांनी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
लोकशाही दौडसाठी शासकीय / निम शासकीय कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालय, सहकार खाते, गृह विभागांतर्गत पोलिस विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर महानगरपालिका व इतर विभाग तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जागरुक नागरिक इत्यादींचा समावेश असून यासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची संख्या सहा हजारपेक्षा जास्त आहे. देशामध्ये प्रथमत:च मतदार जनजागृतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लोकशाही दौडमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने झालेली नोंदणी ही विक्रमी असण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे. कोल्हापूर येथील लोकशाही दौडचे आयोजनासोबतच जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणीदेखील दि.7 एप्रिल रोजी एकाच वेळी अशाप्रकारची दौड होणार आहे.
लोकशाही दौडचे उदघाटन श्री.अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर यांचे हस्ते होत असून के मंजू लक्ष्मी प्रशासक तथा आयुक्त महानगरपालिका कोल्हापूर, श्री.कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर, श्री.महेंद्र पंडीत, पोलिस अधिक्षक, कोल्हापूर आणि श्री.संपत खिलारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. धावण्यामध्ये विश्वविक्रम केलेल्या धावपटू कु.आसमा कुरणे यांची सदर दौडसाठी विशेष उपस्थिती असणार आहे.
दौडचे आयोजन नियोजनबध्द पध्दतीने करण्यासाठी कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ज् कॉलेज ऑफ इंजिनियरींग, (के.आय.टी.) कोल्हापूर आणि संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथील 250 महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनी स्वयंप्रेरणेने स्वयंसेवक म्हणून त्यांचे योगदान देणार आहेत. दौड संपल्यानंतर त्याच ठिकाणी ज्यांना मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नोंदणी करावयाची असेल त्यांच्यासाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सहभागी धावपटूंना आयोजकांकडून टी-शर्ट भेट देण्यात येत असून नोंदणी केलेल्या नागरिकांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे टी-शर्ट दि.6 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 12.00 नंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथून प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.
लोकशाही दौडच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी स्वयंस्फुर्तीने प्रेरीत होऊन त्यांना राज्यघटनेने दिलेला पवित्र हक्क 100% बजावावा यासाठी स्वीप अंतर्गतचा हा उपक्रम यशस्वी करावा व या उपक्रमासाठी शहरातील नागरिकांनी दौडच्या मार्गावर उपस्थित राहून धावपटूंना प्रोत्साहित करावे असे आवाहन श्री.अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.