बुद्धी आणि कौशल्यांच्या जोरावर यश नक्की : कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे प्रतिपादन; डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘दीक्षारंभ’ उत्साहात
schedule11 Sep 25 person by visibility 130 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : नवतंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. मानवी मेंदू एवढे प्रगत तंत्रज्ञान कोणतेही नाही. त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून नव संशोधन व विविध कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडेल असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले. डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ‘दीक्षारंभ’ स्वागत समारंभात ते बोलत होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा ‘दीक्षारंभ’ बुधवारी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, परीक्षा नियंत्रक प्रा. अभय जोशी, डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजीत मटकर, डेप्युटी रजिस्ट्रार प्रा. अश्विन देसाई आदी व्यासपीठावर उपस्थिती होते. यावेळी ९८.55 पर्सेंटाईल मिळवून डाटा सायन्सला प्रवेश घेणाऱ्या सिद्धी राजपूत हिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉ. शर्मा म्हणाले, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी नेहमीच विद्यार्थ्याना चांगल्या सुविधा आणि सर्वोत्तम शिक्षण देण्यावर भर दिला आहे. विद्यार्थी हीच खरी संपत्ती असून त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे काम संस्था करत आहे. आजच्या स्पर्धात्मक जगाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना बहुशाखीय शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यानी केवळ कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता स्वतःच्या बुद्धीचा योग्य वापर करून प्रगती साधणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अजित पाटील यांनी केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आणि पालक यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवू. अत्याधुनिक सुविधा, तज्ञ प्राध्यापक वर्ग यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असेल.
कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता म्हणाले, जन्मावेळी, शाळेत प्रवेश घेताना आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेताना असे एकूण तीन वेळा दीक्षारंभ होतो. या टप्प्यात प्रोफेशनल एज्युकेशनवर भर असेल, यामध्ये तुम्हाला तुमच्या मेंदूचा पुरेपूर वापर करावा लागेल. संस्थेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी २० मंच कार्यरत आहेत. संस्थेत इनोव्हेशन व संशोधनासाठी मोठ्या संधी आहेत, यासाठी प्रोत्साहन व पाठबळ दिले जाते.
कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले यांनी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना आणि विस्तार याची माहिती दिली. विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून उच्च दर्जाचे शिक्षण देण्यावर संस्थेचा भर असतो. येथे प्रवेशित झालेले विद्यार्थी आई-वडील आणि संस्थेचं नाव मोठे करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी काही पालकांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये प्रा. सुनील पाटील यांनी, एका चांगल्या संस्थेत आपल्या पाल्याचा ऍडमिशन झाल्याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी प्रा. डॉ. अजित पाटील यांनी सादरीकरणाद्वारे संस्थेच्या कार्याचा व महाविद्यालयाच्या शैक्षणिक नियोजनाचा आढावा मांडला. संस्थेला नॅक ‘ए प्लस प्लस’, एनआरएफ १५० रँक आणि क्यूएस आय-गेज कडून डायमंड मानांकन मिळाले आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामजस्य करार करण्यात आले आहेत. उद्योगजगतातील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असून अनुभव व प्रयोगात्मक शिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपच्या सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, डॉ. अद्वैत राठोड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. उमराणी जे, डॉ. अमृतकुंवर रायजादे, डॉ. मारुती देवकर, रुधीर बारदेस्कर, महाविद्यालय विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासह बाराशेहून अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. मारुती देवकर यांनी केले तर आभार अभिजीत मटकर यांनी मानले.