तंत्रज्ञान विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर समन्वय व सहकार्य आवश्यक : मिग्सु झिया; केआयटीत चीन,पोलंड येथील विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय तांत्रिक परिषदेचे आयोजन
schedule11 Sep 25 person by visibility 191 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या पुढाकाराने व शांघाई ज्याओ टॉग युनिव्हर्सिटी,चीन निन्झिया युनिव्हर्सिटी,चीन व एजीएच युनिव्हर्सिटी,पोलंड तीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय इनोव्हेटिव्ह इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी या विषयाला घेऊन परिषदेचे आयोजन केले आहे. ११-१२सप्टेंबर २०२५ रोजी येथील हॉटेल सयाजी येथे संपन्न होत आहे.आज या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन निन्झिया युनिव्हर्सिटी चीन विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मिग्सु झिया यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे संचालक व या परिषदेचे समन्वयक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी केले. केआयटी कॉलेजचे गेल्या ४२ वर्षातील अभियांत्रिकीच्या दर्जात्मक शिक्षणासाठी केलेले प्रयत्न व यातूनच राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरून मिळालेले आर्थिक सहकार्य याबद्दल माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण होणे आवश्यक असल्याचे नमूद करत या परिषदेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.
या परिषदेचे मुख्य उद्घाटक प्रा. मिग्सु झिया यांनी तंत्रज्ञान विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर परस्पर समन्वय व सहकार्य अत्यंत आवश्यक आहे हे नमूद करताना अशा प्रकारच्या परिषदांमधून नवनवीन कल्पनांना सादर करण्याची संधी तरुण अभियंता, शास्त्रज्ञांना मिळते असे ते म्हणाले. जागतिक स्तरावर मटेरियल हा फार मोठा संशोधनाचा व सातत्याने विकसित होणारा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच प्रकारच्या उद्योग क्षेत्रांमध्ये मटेरियल्स या विषयाला घेऊन जागतिक स्तरावरती फार मोठे संशोधन सुरू आहे व अशा कल्पनांची तपशीलवार चर्चा अशा प्रकारच्या परिषदांमधून व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटन सत्रामध्ये आयआयटी भुवनेश्वरचे डॉ. ब्रिज कुमार धीन्द्रा यांनी सर्व तरुणाईला संशोधन व इनोवेशन या विषयात आवर्जून काम करण्याबाबत आवाहन केले. फ्रान्स येथील आय.टी.इ.आर या प्रोजेक्ट मधील मुख्य अधिकारी श्री.श्रीशैल पडसलगी यांनी ऊर्जा व त्या संदर्भातील विविध अडचणी व त्याचे महत्त्व व अशा क्षेत्रात अपेक्षित असणारे संशोधना बाबत आपले विचार व्यक्त केले. चीनमधील शांघाई ज्याओ टॉग युनिव्हर्सिटी चे प्रा.जून ली व पोलंड येथील एजीएच विद्यापीठाचे डॉ. क्रिस्तोफ गारबॉक्स यांनी अनुक्रमे उर्जा व स्पेस रिसर्च विषयामध्ये जागतिक स्तरावरती कशा प्रकारचे काम चालू आहे व कशा प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण संस्थेचे चेअरमन अध्यक्ष साजिद हुदली यांनी केले. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादातून तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असताना नवनवीन कल्पना नवनवीन विचार उदयाला येतात व अशा नवीन वैचारिक मंथनातून जगासाठी काहीतरी चांगले योगदान देणे शक्य होत असते असे ते म्हणाले. जगाचे भवितव्य अधिक चांगले होण्यासाठी देशादेशांमध्ये अशा प्रकारचा संवाद सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.पुढे ते म्हणाले “ ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद ज्ञानासोबतच मानवी मूल्यांचीही देवाण-घेवाण देणारी ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.”
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार आयोजकांच्याकडून करण्यात आला. याप्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.व्यंकटेश्वर व डॉ.अन्वेष मंडल उपस्थित होते.उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन परिषदेचे सह समन्वयक डॉ प्रशांत पोवार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुती काशीद व प्रा.जहिदा खान यांनी केले. या दोन दिवसीय परिषदेसाठी भारतातील १० राज्यातून व जगातील आठ देशातून संशोधन, तंत्रज्ञान सादर केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्कोपस दर्जा असणाऱ्या जर्नल्स मध्ये येथील सादर केलेल्या संशोधनाची माहिती प्रकाशित केली जाणार आहे.
याप्रसंगी संस्थेचे सचिव दीपक चौगुले,परिषदेचे सह-समन्वयक डॉ.वाय.एम.पाटील,विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिष्ठाता, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच देश व आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेले अभियंते व शास्त्रज्ञ उपस्थित होते.