भारत सरकारच्या पेटंट विषयक वैज्ञानिक सल्लागारपदी प्रा. डॉ. सी.डी. लोखंडे यांची पुनर्नियुक्ती; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सन्मान
schedule11 Sep 25 person by visibility 140 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता आणि संशोधन संचालक प्रा. (डॉ.) सी.डी. लोखंडे यांची भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या नियंत्रक जनरल कार्यालयातर्फे पेटंट विषयक वैज्ञानिक सल्लागार पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत नियंत्रक जनरल कार्यालयाने पेटंट अधिनियम, 1970 मधील कलम 115 आणि पेटंट नियम, 2003 मधील नियम 103 नुसार अद्ययावत वैज्ञानिक सल्लागारांची यादी प्रकाशित केली आहे. या यादीत जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
भारतीय पेटंट कार्यालयामार्फत पेटंट उल्लंघन प्रकरणांमध्ये न्यायालयांना तांत्रिक आणि वैज्ञानिक बाबी समजून घेण्यासाठी मदत करणाऱ्या वैज्ञानिक सल्लागारांची यादी तयार केली जाते. या यादीतील सल्लागार न्यायाधीशांना तांत्रिक बाबी समजून घेण्यास मदत करतात. वैज्ञानिक आणि तथ्याधारित अहवाल सादर करणे, तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणे, न्यायनिर्णय अधिक माहितीपूर्ण आणि स्पष्ट होण्यासाठी मदत करणे आदी कार्यामध्ये मदत करतात.
डॉ. लोखंडे हे गेल्या १० वर्षांपासून डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात संशोधन संचालक म्हणून कार्यरत असून त्यांनी ७५० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. त्याचबरोबर १०० पेक्षा अधिक पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत
डॉ. लोखंडे यांची नियुक्ती कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठासाठी गौरवाची बाब असून त्यांच्या वैज्ञानिक योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या नियुक्तीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.