लोकशाही दिनी नव्याने २०६ अर्ज दाखल
schedule05 May 25 person by visibility 251 categoryराज्य

कोल्हापूर : आत्तापर्यंत लोकशाही दिनात दाखल झालेल्या अर्जांबरोबरच नव्याने दाखल झालेल्या अर्जांचाही प्राधान्याने निकाली काढावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
या लोकशाही दिनी नव्याने २०६ अर्ज दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिणी चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, ‘आपले सरकार’ व ‘पीजी पोर्टल’ वरील तक्रारींचेही लवकरात लवकर निराकरण झाले पाहिजे. प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेण्यात आला.
आज झालेल्या लोकशाही दिनी शासकीय व निमशासकीय विषयांशी संबंधित प्रशासकीय स्तरावरील एकूण २०६ अर्ज नागरिकांनी सादर केले. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयात ६६, जिल्हा परिषद कार्यालयात ४२, पोलिस विभागात २३ आणि इतर विभागांमध्ये ७५ अर्ज दाखल झाले.